(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Oxygen Crisis | ऑक्सिजन अभावी दिल्लीत 20 तर अमृतसरमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या परिस्थितीने गंभीर रूप धारण केलं असून ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत आहे. दिल्लीच्या 'जयपूर गोल्डन' रुग्णालयात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून 20 रुग्णांचा तर अमृतसरमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जयपूर गोल्डन रुग्णालयातील प्रशासनाच्या माहितीप्रमाणे, रुग्णालयातील आयसीयूमधील ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण गंभीर स्थितीत होते. अजूनही ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे आणखी काही गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
पंजाबच्या अमृतसरमध्ये निळकंठ नावाच्या एका खासगी रुग्णालयामध्ये सहा रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाल्याचं समोर आलंय त्यामध्ये पाच रुग्ण हे कोरोनाचे होते. हॉस्पिटलने ऑक्सिजनचा प्रवाह योग्य प्रमाणात केला नाही त्यामुळे रुग्णांचा जीव गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर रुग्णालय खासगी असल्याने आपल्याला जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, त्यामुळे या रुग्णांचा जीव गेला असल्याचं रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितलं.