PM Modi | वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यास लसीकरण सुरु होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरसवरील लसीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना आज (4 डिसेंबर) माहिती दिली. "तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील काही आठवड्यात कोरोना लस तयार होईल. वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल देताच भारतात लसीकरण सुरु होईल," असं मोदींनी या बैठकीत सांगितलं. ते म्हणाले की, "लसीचा साठा आणि रिअल टाईम इन्फर्मेशनसाठी खास सॉफ्टवेअर तयार केलं आहे." "कोरोनाचं लसीकरण अभियान व्यापक असेल. अशा अभियानांविरोधात अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे तुम्ही लसीबाबत जागरुकता निर्माण करा," असं आवाहन मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना केली.
भारतात कोरोना लस कधी येणार?
"काही दिवसांपूर्वी लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांसोबत माझी बातचीत झाली. आपल्या वैज्ञानिकांना यशाबाबत खात्री आहे. भारतात लस चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे आणि त्यांचं उत्पादन भारतातच होणार आहे. देशाच्या तीन लस देखील विविध टप्प्यात आहेत. तज्ज्ञांचे मते लसीकरण फार दूर नाही. वैज्ञानिक हिरवा कंदिल देताच भारताचं लसीकरण अभियान सुरु होईल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.