Covaxin Clinical Trial | 2 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिनच्या चाचणीला परवानगी
नवी दिल्ली : 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची क्लिनिकल चाचणी घेण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. तज्ज्ञ समितीने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी शिफारस केली होती. त्याला आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. 525 स्वयंसेवकांवर ही चाचणी होणार आहे.
भारत सध्या कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सोबतच देशात लसीकरणही सुरु आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यात लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवला आहे. त्यात आता 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी करण्यास परवानगी देऊन सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
ही क्लिनिकल ट्रायल 525 जणांवर होणार आहे. दिल्लीतील एम्स, पाटण्यातील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. कोरोना लसीशी संबंधित समितीच्या शिफारशींनुसार, भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्याआधी दुसऱ्या टप्प्याचा डेटा उपलब्ध करावा लागेल.























