Buldana : बुलढाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस, मणी गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
Buldana : बुलढाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस पडत असल्याची बातमी पसरली आणि काही वेळातच हे मणी गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली..... बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई औरंगाबाद नागपूर महामार्गावर डोनगावजवळ काल दुपारी हा प्रकार घडला. रस्त्याच्या कडेला काही जणांनी सोन्यासारखे दिसणारे मणी पडलेले पाहिले. ही बातमी काही वेळातच सगळीकडे पसरली. महामार्गाच्या बाजूला विखुरलेले मणी गोळा करण्यासाठी मग नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. प्रत्येकजण महामार्गावर पडलेले मणी गोळा करण्यात मग्न होता. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. मग पोलीसही तिथं पोहोचले..... त्यांनी सोन्यासारख्या दिसणाऱ्या मण्यांची शहानिशा केली. तेव्हा सोन्याचे मणी शोधणारे सगळेच भानावर आले. सोन्यासारखे दिसत असले तरी ते मणी सोन्याचे नव्हते. एका महिलेच्या गळ्यातील पोत तुटून मणी रस्त्यावर विखुरले. आणि ते सोन्याचे असल्याचं समजून नागरिकांची झुंबड उडाली. अखेर ही सोन्याच्या मण्यांच्या पावसाची अफवाच ठरली आणि ज्यांच्या हाती हे मणी लागले ते नागरिक हिरमुसले होऊन परतले.























