अकोला-खांडवा रेल्वेबाबत महत्त्वाचा निर्णय, वन्यजीव समितीच्या बैठकीनंतर यादव तरटेंशी खास बातचीत
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील सातपुड्याच्या रांगेत वसलेल्या ब्रिटिश कालीन महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील हे ही उपस्थित होते. अकोला खंडवा या ब्रॉडगेजच्या कामाला सुरुवात झाली. परंतु मेळघाटातून ही रेल्वे गेल्यास वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका पोहोचेल व लोकांनाही याचा फायदा होणार नाही असे मत व्यक्त केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त करीत म्हटले की, रेल्वे जंगलातून जाणे वाघाच्या व मानवाच्या हिताचे नाही. ती बाहेरून गेली तर दीडशे गावांना व शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच वाघांना त्रास होणार नाही. मेळघाटातील रेल्वे बाहेरून गेली पाहिजे. अभयारण्य घोषित करण्यापूर्वी जनमत घेतले जाते. मग रेल्वे रोड निर्माण करण्याआधी वाघ, प्राणी व पक्षी यांचे मत घेतले जाते का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी वन अधिकाऱ्यांना केला.