(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report | पैशांची गुंतवणूक करताना सावध राहा; 500 ते 700 लोकांची 30 कोटींची फसवणूक
औरंगाबाद : औरंगाबादसह अन्य शहारात कमोडीटी ट्रेडींगच्या नावाखाली 500 ते 700 लोकांना जवळपास 30 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दाम दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून या गँगने फसवले आहे. या गँगचा मोरक्या अक्षय उत्तम भुजबळ याच्या विरोधात तीन महिन्यापूर्वी फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या लोकांनी दिलेल्या माहीतीनुसार 2017 मध्ये अक्षय भुजबळ या 26-27 वर्षाच्या तरुणाने सिडको एन 2 भागात एस. एस. जे कमोडीटी या नावाने ऑफीस उघडले आणि त्याचा फसवणुकीचा धंदा सुरु केला. या तीन वर्षात वेगवेगळे आमिषे दाखवून त्याने शहरात एजंटचे जाळे तयार केले. चांगले ग्राहक आणणाऱ्या लोकांना चार चाकी गाडी, थायलंड, मलेशिया टूर अशी बक्षीसे दिली. शहराजवळील मोठ्या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये सेमिनार आणि भोजनावळी दिल्या. अनेकांना डाऊन पेमेंट भरुन चारचाकी गाड्या घेवून दिल्या. जोपर्यंत हा खेळ चालला तोपर्यंत त्याचे हप्तेही भरले. हे सगळे पाहून अनेकांनी अक्षय आणि त्याच्या साथिदाराकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. अगदी 50 हजार रुपयांपासून 75 लाखापर्यंत काहांनी पैसा लावला.