Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE
अकोला: अकोला जिल्ह्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं या अहवालात उघड झालं आहे. 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता, त्याला कुठे-कुठे नेण्यात आले सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि न्याय त्याला द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी आताच ही बातमी ऐकली की अकोल्या जिल्ह्यात एका मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. आधी असे दाखविण्यात आले होते की, हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, आता शवविच्छेदन अहवालामध्ये वेगळं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबाकडून आता सुरक्षेची मागणी केली आहे, त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी. मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या कुटुंबाच्या समोर सत्य आले पाहिजे.या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी असंही अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे.