मुंबई : सारंगी महाजनांचे आरोप केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी, प्रकाश महाजनांचा दावा
भाजपचे नेते प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या करणारा धाकटा भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी यांनी सनसनाटी आरोप केले आहेत. प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजप खासदार पूनम महाजन यांचा पीए गुंड पाठवून जीवे मारण्याची धमकी देतो, असा आरोपही सारंगी यांनी ‘एबीपी माझा’शी एक्स्क्लुझिव्ह बातचित करताना केला.
उस्मानाबादेतील तपस्वी 29 गुंठ्यांच्या जमिनीवरुन सध्या सारंगी महाजन आणि महाजन कुटुंबीयांमध्ये वाद सुरु आहे. त्याच मुद्द्यावरुन बोलताना सारंगी यांनी गंभीर आरोप केले. उस्मानाबादमध्ये पाय ठेवला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी पूनम महाजनांच्या गाडीतून आलेल्या गुंडांनी दिल्याचा दावा सारंगी यांनी केला.
दरम्यान, सारंगी यांना कोणीही धमकी दिलेली नाही, सहानुभूती मिळवण्यासाठी त्या खोटे आरोप करत असल्याचा दावा प्रवीण महाजन यांचे ज्येष्ठ बंधू प्रकाश महाजन यांनी केला. प्रकाशझोत मिळवण्यासाठी हयात नसलेल्या माणसांवर आरोप केल्याचा दावाही त्यांनी केला.