(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur by Election | कोरोनाच्या संकटात पंढरपुरात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान
पंढरपूर : राज्यात दर दिवशी कोरोनाचं संकट अधिक गडद होत असतानाच पंढरपूर आणि बेळगाव या भागांमध्ये पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघांत आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून प्रमुख लढत भाजप उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यातच होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यात भाजप व राष्ट्रवादी शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील , शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे , वंचित बहुजन आघाडीचे बिराप्पा मधुकर मोटे आणि सिद्धेश्वर अवताडे हे प्रमुख काही उमेदवार आहेत . यातील सिद्धेश्वर अवताडे हे भाजपच्या समाधान अवताडे यांचे चुलत बंधू असून या निवडणुकीत भाऊ बंधकी भाजपाला अडचणीची ठरायची शक्यता आहे . स्वाभिमानी , वंचित आणि अपक्ष शैला गोडसे यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढलेल्या आहेत. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मोठ्या विजयाच्या वल्गना केल्या असल्या तरी हि निवडणूक अतिशय घासून व चुरशीची असल्याने येथे काट्याची टक्कर होणार आहे . एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार या 19 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असून आज 524 मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान केले जाणार आहे. यावेळी कोरोनाबाधित मतदारांना सायंकाळी 6 ते 7 यावेळेत मतदान करता येणार आहे .