(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, राज्यापाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी बजावला मतदानाचा हक्क
गोव्यामध्ये विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. 40 जागांसाठी एकूण सर्व पक्षांते मिळून 301 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 17 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, लुईझींनो फलेरो आणि दिगंबर कामत यांच्या मुख्यमंत्री पदावरून झालेल्या अंतर्गत वादात भाजपाने आपल्या 13 आमदारसह महाराष्ट्र गोमंतक पक्ष 3 आमदार, गोवा फॉरवर्ड 3 आमदार व 2 अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून विजयी झालेले विश्वजित राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपची एक जागा वाढली परिणामी काँग्रेसची एक जागा कमी झाली.