बीड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्ष; अजित पवारांच्या कार्यक्रमात शिवसैनिक दाखवणार काळे झेंडे
बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे शिवसेनेने मंजूर करून आणलेल्या विकासकामांना आडकाठी घालत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाला समज द्यावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
Beed VidhanSabha Assembly : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र काम करणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बीडमध्ये कायम धुसफूस चालू असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष नेहमीचा असला तरी बीड विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष मंजूर केलेल्या कामाची बीडच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप बीडच्या शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे शिवसेनेने मंजूर करून आणलेल्या विकासकामांना आडकाठी घालत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन येथील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाला समज द्यावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून बीड मतदारसंघासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामांना विशेष मंजुरी दिली होती. परंतु, त्याच कामांची बीडच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून अडवणूक होत आहे. हा प्रकार न थांबल्यास येत्या सोमवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्यावेळी काळे झेंडे दाखविण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी बीडमध्ये शंभर कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ आहे. या कार्यक्रमाला अजित पवार हे ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत. परंतु, अजित पवार यांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिला आहे.
अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये 100 कोटींच्या विकास कामांचा सोमवारी भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा
बीड विधानसभा क्षेत्रात आमदार संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारकडून निधी आणला आहे. या 100 कोटी 60 लाख रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती असणार आहे.
या विकास कामांना मिळाला निधी
बीड येथील वाढीव 200 खाटांच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 58.21 कोटी, बीड येथे तालुका क्रीडा संकुलच्या जागेवर बॅडमिंटन हॉल-जिम हॉल व कार्यालय इमारत बांधकाम करणे 1 कोटी, बीड येथे नवीन व्हिव्हिआयपी विश्रामगृह बांधणे व अस्तित्वातील विश्रामगृहाचे नुतणीकरण करणे 7.23 कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड या संस्थेची प्रशासकीय इमारत व कार्यशाळा बांधकाम करणे आठ कोटी, साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला-रस्ता 28 किलोमीटर12/0 ते 34/00 मध्ये सुधारणा करणे 3.88 कोटी, राममा 222 ते जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला ते 28 रस्त्यावर कि.मी.19/00 मध्ये पुलाचे बांधकाम करणे 3.50 कोटी, राममा 222 ते जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला ते 28 रस्त्यावर किलोमीटर 17/500 मध्ये पुलाचे बांधकाम करण्यासाठी 1 कोटी, रामा 63 ते बेलुरा-नारायणगड रस्ता 30 किलोमीटर 3/100 मध्ये पुलाचे बांधकाम करण्यासाठी 60 कोटी, बीड तालुक्यातील उरसे द्रुतगती वडगाव-चाकण-शिक्रापूर-जामखेड-बीड-म्हाळसजवळा-लऊळ-पात्रुड रस्त्यावरी लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी दोन कोटी, बीड राष्ट्रीय महामार्गाचे 211 पालवण-नागझरी-बेंडसूर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव रसत्यावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटी, राष्ट्रीय महामार्ग 63 ते बेलुरा-नारायणगड रस्त्यावर पुलाचे बांधकामासाठी दीड कोटी, साक्षाळपिंप्री-पारगाव सिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला रस्त्याच्या लांबीत सुधारणा करण्यासठी तीन कोटी, बीड तालुक्यातील करचुंडी ते पाटोदा रस्त्याच्या सुधारणेसाठी करणे. ता.बीड 2.90 कोटी, बीड राष्ट्रीय महामार्ग ते पालवण-नगझरी-बेंडसूर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव-पाचंग्री रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 1. 30 कोटी, बीड पंचायत समिती, जि.प.बीड नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 4.48 कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या