Zero Hour : मविआ-महायुतीच्या जागावाटपाचा गोंधळ ते पुण्यात सापडलेले 5 कोटी,सविस्तर चर्चा
नमस्कार मी विजय साळवी. झीरो अवरमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडू लागलाय. गुलाल आणि फटाक्यांच्या खरेदीलाही सुरुवात झालीय.. फक्त गुलाल कोण उधळणार यासाठी आपल्याला २३ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.पण सध्या तरी इच्छुक उमेदवारांसमोर गुलाल उधळण्यासाठी खरं आव्हान उभं राहिलंय ते आहे उमेदवारीचं. मंडळी एकदम बरोबर ऐकलंत. इच्छुक उमेदवारांसमोर आव्हान उभं राहिलंय ते आहे उमेदवारीचं.
अनेकांनी गुलालाची ऑर्डर देऊन ठेवलीय खरी. पण, अजूनही त्यांच्या उमेदवारीचाच पत्ता नाही असं चित्र राज्यातल्या २८८ मतदारसंघात दिसतंय..भाजपनं सर्वात आधी ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली. पण त्यांनाही अनेक मतदारसंघांमधून नाराजीचा सामना करावा लागतोय. फक्त पक्षातूनच नाही तर भाजपनं जाहीर केलेल्या काही उमेदवारांना मित्रपक्षांमधूनही विरोध सहन करावा लागतोय..
सध्या फक्त महायुतीतच नाही तर महाविकास आघाडीतही असाच गोंधळ सुरु आहे. कारण, इथं मविआतील पक्षांनी निवडणुकांसाठी एबी फॉर्म्सही वाटायला सुरुवात केलीय. पण, जागावाटप काही जाहीर केलेलं नाहीय.. तुम्ही म्हणाल की मग हे एबी फॉर्म कसं काय वाटप करतायेत. तर मंडळी, काँग्रेस, ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात जवळपास २१० जागांवर एकमत झालंय. त्यामुळं आपापल्या पक्षाच्या वाट्य़ाला आलेल्या जागांचा आकडा जाहीर करण्याआधीच एबी फॉर्म्स वाटप सुरु झालंय.. तेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत.. पण, त्याआधी आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा सांगतो.. काल दिवसभर दिल्लीत... आणि आज दिवसभर मुंबईत मविआच्या नेत्यांच्या बैठकाच बैठका पार पडल्या..
दिल्लीतून काँग्रेसनं मविआत निर्माण झालेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आणि समन्वयासाठी बाळासाहेब थोरातांना जबाबदारी सोपवली. तेच बाळासाहेब आज सकाळी पोहोचले सिल्व्हर ओक बंगल्यावर... तिथं शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर साधारण दुपारी बाराच्या सुमारास बाळासाहेब थोरात पोहोचले उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर... ही झाली दुसरी बैठक...
ठाकरेंसोबतची बैठक संपवून बाळासाहेब थोरात पोहोचले विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांच्या घरी पोहोचले. तिथं काँग्रेसच्या नेत्यांसोबत तासभर बैठक चालली. ही होती दिवसभरातील तिसरी बैठक.
साधारण तीन-साडेतीन वाजेपर्यंत तीन बैठका संपवून बाळासाहेब थोरातांनी चौथ्या बैठकीची माहिती दिली. ती होती महाविकास आघाडीची संयुक्त बैठक. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये..
जिथं महाविकास आघाडीमधल्या तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते... त्याच बैठकीत नेमकं काय काय घडलंय.. त्याचीच आपण इनसाईड स्टोरीही जाणून घेणार आहोत... ((त्याच बैठकीनंतर जागावाटपही फायनल झाल्याची माहिती आहे...))
एकूणच काय तर आजच्या घडीच महाराष्ट्राचं राजकारण एका ओळीत सांगायचं झालं तर... गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत बैठका... असंच म्हणता येईल... याच बैठकांच्या सत्रावर होता आपला पहिला प्रश्न... आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला.
है पैसे कुणाचे आहेत, ते कुणाकडे पोहोचवण्यात येत होते याबद्दल पोेलीस,निवडणूक अधिकारी आणि आयकर विभाग काहीही सांगायला तयार नाहीयत. पाच कोटींची रक्कम सापडली, त्या कारमध्ये असलेल्या चौघांनाही चौकशीनंतर सोडून देण्यात आलं.
पण विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट कुणाचं नाव घेतलं नाही. पण सत्ताधारी महायुतीतील ज्या आमदाराचा काय झाडी, काय डोंगार हा डायलॉग व्हायरल झाला होता, त्याच्याकडे हे पैसे पोहोचवले जात होते, असा आरोप त्यांनी केला. दोन अधिक दोन केले तर राऊतांचा रोख शिंदेंचे सांगोल्यातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे होते हे उघड आहे. बरं गाडीचं पासिंग देखील MH 45 आहे, म्हणजे अकलूज RTO. अकलूज आणि सांगोल्यात अवघ्या ७० किलोमीटरचं अंतर आहे. एवढंच नाही तर कारमधील चौघांपैकी एकजण हा शहाजीबापूंचा नातेवाईक आहे, तर दुसरी व्यक्ती ही त्यांची निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातंय.
पण तरीही, पाच कोटींची रक्कम शहाजीबापूंकडेच पोहोचवली जात होती, हे अजून सिद्ध झालेलं नाही, पोलिसांनी तसा अंदाजही वर्तवलेला नाही, हे आम्ही इथे स्पष्ट करू इच्छितो.
याच्याशीच निगडित होता आमचा आजचा दुसरा प्रश्न.. पाहूयात..