Zero Hour Nagpur : बौद्ध लेणींच्या बचावासाठी एकवटले संभाजीनगरकर
ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत.. छत्रपती संभाजीनगरातल्या बौद्ध लेणींच्या बचावासाठी भिख्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी जनतेच्या वतीनं आज एल्गार मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकापासून निघालेला हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर नेण्यात आला. बौद्ध लेणींच्या पायथ्याशी असलेलं विहार आणि विपश्यना केंद्र हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठातील याचिकेच्या अनुषंगानं डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं सर्वेक्षण समिती नेमली होती. त्यानुसार विद्यापीठ परिसरातील १२ धार्मिक स्थळं काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बेगमपुरा पोलिस ठाण्यानं संबंधितांना नोटीसही बजावली. पण बौद्ध लेणींच्या पायथ्याशी असलेलं बुद्धविहार काढण्यास आंबेडकरी समुदायाचा विरोध आहे. बौद्ध लेणींच्या पायथ्याशी असलेलं विहार आणि विपश्यना केंद्र या वास्तूंना ५५ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. बुद्धविहाराचं बांधकाम हे विद्यापीठाच्या जागेवर नसून, ते गावठाणमध्ये आहे. त्याचं 'ना-हरकत' प्रमाणपत्र आहे. तसंच विपश्यना केंद्रात लाखो लोक विपश्यनेसाठी येतात. त्याचबरोबर धम्मचक्क अनुप्रवर्तन दिनी लाखो अनुयायांची गर्दी होते. त्यामुळं पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ शांततेनं मोर्चा काढून विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं...
याच बातमीसह आजच्या झीरो अवरमध्ये आपण इथंच थांबूया. उद्या संध्याकाळी सात वाजून ५६ मिनिटांनी झीरो अवरच्या नव्या भागात आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहाच राहा एबीपी माझा.