(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत बिघाडी? झेडपीत महाविकास आघाडी टिकणार? Special Report
नागपूर : काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला, तरी पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून उतरवून लाथा घाला, असं वक्तव्य सुनील केदार यांनी केलंय. नागपूरमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणूक आणि बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना गद्दारांना धडा शिकवण्याचा सल्ला सुनील केदार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. सुनील केदार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
"काँग्रेसचा कितीही मोठा नेता काँग्रेस पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून उतरवा आणि दोन लाथा लावा, तुमच्यावर पोलीस केस झाली तर मी पाहून घेईन." अशा शब्दात राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याचा आदेशच कार्यकर्त्यांना दिला आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका तसेच जिल्ह्यातील काही बाजार समित्यांच्या निवडणुका होत असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाच्या आढावा बैठकीत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा कितीही मोठा नेता काँग्रेस पक्षाशी बेईमानी करत असेल, तर त्याला गाडीतून उतरवा आणि दोन लाथा लावा, पोलीस केस झाली तर मी पाहून घेईन, असं सुनील केदार म्हणाले आहेत. तसेच, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार मैदानात असताना जर कोणी नेता कोणीतरी मोठा नेता पाठीशी आहे, असं समजून मी निवडणुकीत वाट्टेल ते करेन, असं वागत असेल तर त्याला दोन लावा, नंतर मला फोन करा, मी पण मंत्रिपद बाजूला ठेवून तिथे येईन असंही ते कार्यकर्त्यांना म्हणाले.