(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Toolkit case | Disha Ravi ला अटक आणि राजकारण
नवी दिल्ली: पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिल्ली शेतकरी आंदोलनाशी संबंधी एक टूलकिट शेअर केलं होतं. या टूलकिटमध्ये खलिस्तानवादी अॅंगल असल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात रविवारी बेंगळुरुतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक करण्यात आली आहे.
ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट खलिस्तानवादी समर्थकांनी तयार केलं आहे असा संशय व्यक्त करत त्या टूलकिटवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणाचा तपास सुरु केला असून त्या संबंधी दिशा रवी या 21 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. दिशा रवीने हे टूलकिट तयार करण्यात आणि ते फॉरवर्ड करण्यात महत्वाची भूमिका बजावली असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या संबंधी आपल्याकडे पुरावा असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केलाय.
या टूलकिट तपासाच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी लोकांची नेमकी काय भूमिका आहे याचा तपास सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिशा रवीला पाच दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये ठेवण्यात येणार आहे.
कोण आहे दिशा रवी?
खलिस्तानवादी समर्थक संघटना असलेल्या पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या मदतीने दिशा रवी देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दिशा रवी ही बेंगळुरुतील माउंट कार्मेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून ती पर्यावरण चळवळीत सक्रिय आहे. दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या मोहीमेची सह-संस्थापक आहे. 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या मोहीमेच्या माध्यमातून पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग चर्चेत आली होती. या मोहीमेच्या माध्यमातून जगभरातील पर्यावरणच्या प्रश्नावर आवाज उठवला जातोय.