Saat Barachya Batmya 712 : राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, पेरण्या रखडल्या ABP Majha
गेल्या तीन वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यातच ८० टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होत होती. यावर्षी मात्र, जुलै महिन्याची १२ तारीख उजाडली तरी, आता पर्यंत केवळ १५ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे पाच लाख चार हजार हेक्टर पैकी एक लाख ६९ हजार हेक्टर्सवरच ३३.५८ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली. अद्यापही तीन लाख ३५ हजार शेत जमीन ओसाड आहे. सिना कोळेगाव धरणाने तळ गाठला असून मांजरा २३ व निम्न तेरणा मध्ये २८.४७ टक्के पाणी साठा असल्याचे दिसून आले. अद्यापही पावसाचा पत्ताच नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्ग चिंतेत अडकला असल्याचे दिसून आले. याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात.
यंदा राज्यभरात अगोदरच पावसाने दडी मारलीय, त्यातच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र पीक उगवणीच्या वेळेतच विविध भागात शंखी गोगलगायींनी मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडलाय, नेमकेच उगवत असलेल्या पिकांचा फडशा या गोगलगायी पाडत असून शेतकऱ्यांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणावर वाढलीय. त्यामुळे या शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. नेमकं कसे हे व्यवस्थापन करायचे आणि शंखी गोगलगायींचा नायनाट कसा करावा. हे सांगताहेत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशात्र विभागाचे तज्ञ डॉ दिगंबर पटाईत..
मोसमी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ४७ टक्केच पेरण्या झाल्या असून, चालू आठवड्याअखेर पाऊस न झाल्यास कडधान्यांच्या लागवडीला फटका बसण्याची शक्यता आहे. ज्वारी १५ टक्के, बाजरी दहा टक्के, मक्याची ३८ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. खरिपातील तृणधान्यांची पेरणी एकूण १८ टक्क्यांवर गेली आहे. कापसाची पेरणी ६७ टक्के क्षेत्रावर झाली आहे. तूर वगळता कडधान्यांची पेरणीही रखडली आहे. तुरीची ४४ टक्के, मुगाची १६ टक्के, उडदाची १४ टक्के आणि अन्य कडधान्यांची पेरणी फक्त पाच टक्क्यांवर झाली आहे. तूर वगळता अन्य कडधान्यांची पेरणी जास्तीत- जास्त २० जुलैपर्यंतच करता येणार आहे. त्यानंतर केलेली कडधान्यांची पेरणी फायदेशीर ठरणार नाही.