Manoj Jarange Majha Katta : शिक्षण, इन्कम ते मराठा आरक्षण माझा कट्टावर जरांगेंचे गौप्यस्फोट
मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे कसे काय असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग केला तर ते आरक्षण टिकणार नाही. गेल्या वेळी ईएसबीसी आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं नाही, त्यामुळे ओबीसीमधूनच दिलेलं आरक्षण टिकेल. आम्ही पहिल्यापासूनच ओबीसीमध्ये आहोत, आता नोंदीही सापडत आहेत, मग आरक्षण द्यायला काय अडचटण आहे असं मनोज जरांगे म्हणाले.
पहिला मोर्चा 2013 साली संभाजीनगरमध्ये
मराठा आरक्षणासाठी आपण पहिला मोर्चा हा 2013 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये काढल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. त्यावेळी नेतृत्व कोणीही नव्हतं, सर्वांनी मिळून तो मोर्चा काढल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
प्रत्येकवेळी जवळ आलं की आरक्षण का हुकतंय?
मराठा आरक्षणासाठी गेल्या तीस चाळीस वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे, पण प्रत्येकवेळी आरक्षण टप्प्यात दिसतं आणि जवळ आलं की हुकतं असं जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, आतापर्यंतची आंदोलनं ही का फुटली आणि बंद झाली याचा अभ्यास केला. त्यानंतर आता आंदोलन केलं आणि हे आतापर्यंत 80 टक्के यशस्वी झाल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत 32 लाख नोंदी सापडल्या, म्हणजे 32 लाख घरांमध्ये याचा फायदा झाला त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याचं मानतो. या आधी 1967 नंतरच्या नोंदी घेतल्या जायच्या, आता 1805 पासूनच्या नोंदी तपासल्या जात आहेत. आता 24 डिसेंबर रोजी सरसकट आरक्षण घेणार.
आंदोलनाकडे कुणाचं लक्ष गेलं नसतं तर काय?
आंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर याकडे सर्वांचं लक्ष गेलं. पण जर हा लाठीचार्ज झालाच नसता तर काय झालं असतं असा प्रश्न विचारल्यानंतर जरांगे म्हणाले की, आम्ही ठरवलंच होतं की काहीही झालं तरी आरक्षण घ्यायचं, आंदोलन सोडायचं नाही. 123 गावांचा त्यामध्ये सहभाग होता.