Smartphones : सर्वसामान्यांना बसणार मोठा झटका! स्मार्टफोन्स महाग होण्याची शक्यता, समोर आलं महत्त्वाचं कारण
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सध्या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : नवीन स्मार्टफोन (Smartphones) खरेदी करणाऱ्यांना लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये फोनच्या किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ET च्या अहवालानुसार जून तिमाहीपासून स्मार्टफोनच्या किमती वाढू शकतात. मात्र ही वाढ किती टक्क्यांनी होणार आहे, हे अद्याप सांगण्यात आलं नाही.
वर्षाचा दुसरा तिमाही 1 एप्रिलपासून सुरू होतो. त्यानंतर अनेक स्मार्टफोनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. चिनी करन्सी आणि चिप्सच्या किमतीत वाढ झाल्याने मोबाईलच्या किंमती वाढण्याची शक्यता असल्याचं सागंण्यात येत आहे. सध्या चीनचे चलन युआन सध्या मजबूत स्थितीत आहे.त्यामुळे फोनमधील मेमरी चिप्सच्या किंमतीतही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
स्मार्टफोन बनवण्याचा खर्च वाढण्याची शक्यता
चीनचे चलन असलेले युआन जून 2023 मध्ये 11.21 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होते. ते डिसेंबरमध्ये 12.08 रुपयांपर्यंत वाढले.यामुळे मेमरी चिप्सची किंमत वाढू शकते. अशा परिस्थितीत स्मार्टफोन बनवण्याचा खर्च वाढेल आणि कंपन्यांना हँडसेटच्या किमतीही वाढवाव्या लागतील. त्याचप्रमाणे सध्या 1 युआनची किंमत 11.68 रुपये आहे.
कितीपर्यंत वाढ होऊ शकते?
सॅमसंग आणि मॅक्रॉन सारख्या कंपन्या DRAM (मेमरी चिप्स) बनवतात. बाजार संशोधक ट्रेंडफोर्सच्या अहवालानुसार, या दोन्ही कंपन्या मार्च तिमाहीत त्यांच्या चिप्सच्या किमती 15-20 टक्क्यांनी वाढवू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन चिपसेटची मागणी वाढत आहे.
दरात फारशी वाढ होणार नाही
अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी मोबाईल फोन पार्ट्सवरील आयात शुल्क नुकतेच कमी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा परिस्थितीत फोनची किंमत थोडी कमी होऊ शकते. मात्र, त्यात वाढ होणार की घट, हे या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतच कळेल. मात्र, अद्याप कोणत्याही मोबाईल कंपनीकडून किंमत वाढीची घोषणा केलेली नाही.
OnePlus 12R ची विक्री सुरु
OnePlus ने काही दिवसांपूर्वी आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. OnePlus 12 आणि OnePlus 12R अशी या स्मार्टफोनची सिरिज बाजारात आली आहे. OnePlus 12 ची विक्री सुरू केल्यानंतर, आता कंपनीने OnePlus 12R ची विक्री आजपासून म्हणजेच 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू केली आहे. दरम्यान या फोनवर सध्या अनेक भन्नाट ऑफर्स कंपनीकडून देण्यात येत आहेत. कंपनीने OnePlus 12R हे दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सादर केले. या फोनचा पहिला प्रकार 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 39,999 रुपये आहे. त्याच वेळी, या फोनचा दुसरा प्रकार 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 45,999 रुपये आहे.