T20 World Cup 2022 : इंग्लंड संघाला मोठा झटका, स्टार खेळाडू रीस टोपले विश्वचषक स्पर्धेबाहेर
टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेला सुरुवात झाली असून सुपर 12 चे सामने सुरु होण्यापूर्वीच इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा आघाडीचा गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.
Reece Topley Ruled Out : ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्या सुपर 12 साठी क्वॉलीफायर सामने सुरु आहेत. 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 चे सामने रंगणार असून सुपर 12 मध्ये असणारा आघाडीचा संघ इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्टार खेळाडू गोलंदाज रीस टोपले (reece topley) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. नुकतीच ही माहिती समोर आली असून अद्याप इंग्लंड क्रिकेटने अधिकृत जाहीर केलेलं नाही.
इंग्लंडनं सराव सामन्यात पाकिस्तान संघाला 6 विकेट्स राखून मात दिली. या सामन्यातही टोपले संघात नव्हता. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे कारकिर्दीत बराच काळ आहे. 6 फूट 7 इंच इंग्लंडच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजालाआपल्या कारकिर्दीत पाठीच्या अनेकदा दुखापतीचा सामना करावा लागला आहे. कारकिर्दीचा विचार करता 2022 मध्ये त्याने 16 टी-20 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे तो सुरुवातीसह डेथ ओव्हर आणि मध्ये अशा कोणत्याही ठिकाणी गोलंदाजी करू शकतो. 7.8 च्या इकॉनॉमी रेटसह तो गोलंदाजी करु शकत असल्याने टी20 फॉर्मेटमध्ये तो अत्यंत फायदेशीर गोलंदाज आहे. दरम्यान त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल राखीव खेळाडूंमधील टायमल मिल्सला संघात घेतले जाऊ शकते.
कसा आहे विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ?
इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, अॅलेक्स हेल्स.
राखीव खेळाडू : लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स.
इंग्लंडची विजयी सुरुवात
टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा (England vs Pakistan) सहा विकेट्स राखून पराभव केलाय. ब्रिस्बेनच्या (Brisbane) द गाबा स्टेडियमवर (Gabba) हा सामना खेळला गेला होता. पावसाच्या व्यत्ययामुळं हा सामना 19-19 षटकाचा खेळण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघानं आठ विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं 14.4 षटकातच हे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदी फ्लॉप ठरला. या सामन्यात आफ्रिदीला एकही विकेट्स मिळवता आली नाही.