WBC 2022 : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायनाची विजयी सुरुवात, त्रिशा-गायत्री जोडीही पुढील फेरीत
World Badminton Championship 2022 : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने विजयी सुरुवात केली आहे. दुसरीकडे महिला दुहेरीमध्ये त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही विजय मिळवला आहे.
BWF World Badminton Championship : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये (World Badminton Championship 2022) आपल्या पहिल्याच सामन्यात सायना नेहवालने (Saina Nehwal) हॉंग-काँगच्या च्युंग नगान यी (Cheung Ngan Yi) हिला मात देत विजयी सुरुवात केली आहे. दुसरीकडे महिला दुहेरीमध्ये त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही मलेशियाची जोडी यीन युवान लो (Yeen Yuan Low) आणि व्हॅलेरी सिओ (Valeree Siow) यांना मात दिली.
सायनाने तिच्या सलामीच्या सामन्यात अगदी अप्रतिम खेळ दाखवत एकहाती विजयी मिळवला. केवळ दोन सरळ सेट्समध्ये तिने सामना जिंकला आहे. यावेळी तिच्या समोर हॉंग-काँगच्या च्युंग नगान यी हिचे आव्हान होते. सामन्यातील पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. अगदी अटीतटीच्या झालेल्या सेटमध्ये सायना 21-19 च्या फरकाने जिंकली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सायनाने आपला खेळ अधिक उंचावला आणि 21-9 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत सेट आणि सामना दोन्ही जिंकला. सायना आता दुसऱ्या राऊंडमध्ये जर्मनीच्या यव्होन ली आणि थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान यांच्यातील विजेत्याविरुद्ध खेळेल.
TotalEnergies BWF World Championships 2022
— BWFScore (@BWFScore) August 23, 2022
WS - Round of 64
21 21 🇮🇳Saina NEHWAL🏅
19 9 🇭🇰Ngan Yi CHEUNG
🕗 in 39 minutes
https://t.co/IOs1CHLvpo
महिला दुहेरीतही विजयी
दुसरीकडे त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीच्या जोडीनेही विजयी सुरुवात केली. त्यांनी मलेशियाच्या येन युआन लो आणि व्हॅलेरी सिओ जोडीचा पराभव केला. यावेळी दोन्ही जोड्यांमधील सामना अगदी अटीतटीचा झाला. दोन्ही सेटमध्ये भारतीय जोडीचा दबदबा दिसून आला. यावेळी पहिला सेट भारतीय जोडीने 21-11 तर दुसरा 21-13 च्या फरकाने जिंकत दोन सरळ सेट्समध्ये जिंकत सामना नावे केला. यासह अश्विनी भट के आणि शिखा गौतम यांनीही महिला दुहेरीत मार्टिना कॉर्सिनी आणि ज्युडिथ मायर या इटालियन जोडीचा 30 मिनिटं चाललेल्या सामन्यात 21-8, 21-14 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
मिश्र दुहेरीत मात्र पराभव
पण मिश्र दुहेरीतील व्यंकट गौरव प्रसाद आणि जुही दिवांगन या जोडीला इंग्लंडच्या ग्रेगरी मायर्स आणि जेनी मूर यांच्याकडून 10-21, 21-23 असा पराभव पत्करावा लागला. तनिषा क्रास्टो आणि इशान भटनागर यांनी मिश्र दुहेरीतही 14व्या मानांकित सुपाक जोमकोह आणि थायलंडच्या सुपिसारा पेवसंप्रान यांच्याकडून 14-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत कृष्ण प्रसाद गारागा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला या जोडीला फ्रान्सच्या फॅबियन डेलरू आणि विल्यम विलेगर यांच्याकडून 14-21,18-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
हे देखील वाचा-