पाकिस्तानला ICC विसरलं का; शोएब अख्तरनं सुनावलं
युट्युब चॅनवर व्हिडीओ पोस्ट करत अख्तरनं या माध्यमातून त्याची नाराजी व्यक्त केली. सोबतच त्यानं आयसीसीवर काही गंभीर आरोपही केले.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच (ICC)नं क्रिकेटच्या क्षेत्रात मोलाचं योदगान देणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला. दशकातील सर्वोत्तम टी20 क्रिकेट संघाची आयसीसीकडून निवड करण्यात आली. पण, त्याच संघावर आणि आयीसीसीवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
आपली नाराजी व्यक्त करत त्यानं युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यानं आयसीसीवर काही गंभीर आरोपही केले आहेत. आपण आयपीएल नव्हे, तर जागतिक स्तरावरील दशकातील संघाती निवड करत आहोत याचा आयसीसीला विसर पडला असावा, असं म्हणत शोएबनं पाकिस्तानी खेळाडूंना आयसीसी विसरलं का अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं.
रविवारीच आयसीसीकडून दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड करत टी20 संघाची निवड करण्यात आली. यामध्ये संघाचं कर्णधारपद महेंद्र सिंह धोनी याच्याकडे सोपवण्यात आलं. या संघात चार भारतीय खेळाडूंचा सहभाग असल्याचं पाहायला मिळालं. टी20 क्रिकेट प्रकारात दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना मात्र यातून वगळण्यात आलं होतं.
आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या ICC's T20 team of the decade मध्ये सलामीवीर म्हणून ख्रिस गेल आणि रोहित शर्मा या खेळाडूंची निवड करण्यात आली. तर प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे एरॉन फिंच आणि विराट कोहलीला स्थान देण्यात आलं. या व्यतिरिक्त संघात एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कायरन पोलार्ड, लसिथ मलिंगा, राशिद खान, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता.
संघात एकाही पाकिस्तानी खेळाडूचा समावेश न करणं ही बाब शोएबला चांगलीच खटकली. ज्याबाबत त्यानं व्हिडीओच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. 'त्यांनी (ICC)नं एकाही पाकिस्तानी खेळाडूची निवड केली नाही. आम्हालाही तुमची गरज नाही. कारण तुम्ही तर आयपीएलच्या संघाची निवड केली, जागतिक संघाची नव्हे', असं म्हणत त्यानं संतप्त प्रतिक्रिया दिली. शोएबनं दिलेली ही प्रतिक्रिया पाहता यावर भारतीय क्रिकेट वर्तुळातून किंवा आयसीसीकडून काही उत्तर दिलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.