एक्स्प्लोर
चोवीस कॅरेटचा विराट
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं राजकोट कसोटीत अगदी सवयीनं आणखी एक शतक साजरं केलं. त्याच्या कसोटी कारकीर्दीतलं हे चोविसावं शतक ठरलं. पण या शतकाच्या पलिकडे जाऊन विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटच्या दुनियेतले आणखी काही विक्रमही आपल्या नावावर जमा केले. कोणते आहेत ते विक्रम?
मुंबई | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं राजकोट कसोटीत अगदी सवयीनं आणखी एक शतक साजरं केलं. त्याच्या कसोटी कारकीर्दीतलं हे चोविसावं शतक ठरलं. पण या शतकाच्या पलिकडे जाऊन विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटच्या दुनियेतले आणखी काही विक्रमही आपल्या नावावर जमा केले.
विराट कोहलीनं राजकोट कसोटीत आपल्या कारकीर्दीतलं चोविसावं शतक झळकावलं. वास्तविक शतक झळकावणं हे भारतीय कर्णधाराच्या इतकं अंगवळणी पडलंय की तो कसोटी सामन्याच्या मैदानात उतरतो आणि अगदी सवयीनं शतक झळकावतो. टीम इंडियाच्या कर्णधारानं राजकोट कसोटीत पुन्हा तेच केलं. पण विशेष म्हणजे विराटनं चोविसाव्या कसोटी शतकासह आणखी काही विक्रमांवर नाव कोरुन आपल्या शिरपेचात आणखी काही मानाचे तुरे खोवले.
कोणते आहेत ते विक्रम?
- विराट कोहलीनं सलग तिसऱ्या कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. राजकोट कसोटीत 121वी धाव घेऊन विराटनं 2018 साली हजार धावांचा टप्पा गाठला. या खेळीअखेर त्याच्या नावावर नवव्या कसोटीत 1018 धावा आहेत. याआधी विराटनं 2016 साली 12 कसोटी सामन्यांमध्ये 1215 धावा फटकावल्या होत्या. 2017 साली त्याच्या खात्यात 10 कसोटी सामन्यांमध्ये 1059 धावा जमा झाल्या होत्या. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन वर्ष एक हजारहून अधिक धावा करणारा विराट हा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला.
- ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 24 शतकांचा पल्ला वेगानं गाठणारा विराट हा दुसऱा फलंदाज ठरला. ब्रॅडमन यांनी 66 कसोटी डावांत 24 शतकं झळकावली होती. आता विराटनं 123 कसोटी डावांमध्ये ही किमया साधली.
- राजकोट कसोटीतलं शतक हे विराटचं कर्णधार या नात्यानं सतरावं शतक ठरलं. कसोटीत सर्वाधिक शतकं झळकावलेल्या कर्णधारांच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग या यादीत अनुक्रमे नंबर वन आणि नंबर टू आहेत.
- भारताच्या टॉप टेन कसोटी शतकवीरांच्या यादीत विराट कोहली आता चौथ्या स्थानावर दाखल झाला आहे. या यादीत सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक ५१, राहुल द्रविडच्या नावावर ३६ आणि सुनील गावस्करांच्या नावावर ३४ शतकं आहेत. विराट २४ शतकांसह चौथ्या आणि सहवाग २३ शतकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement