Shane Warne on Travis Head : नाद करा, पण यांचा कुठं म्हणायची वेळ; शेन वाॅर्न सात वर्षापूर्वी हेडबद्दल जे बोलला तेच टीम इंडियाविरुद्ध खरं करून दाखवलं!
टीम इंडियाचे स्वप्न भंग करण्यात ट्रॅव्हीस हेडनं मोला वाटा उचलला. त्याने नाबाद 137 धावांची खेळी करत जी वेदना 20 वर्षांपूर्वी टीम इंडियाला रिकी पाँटिंगने दिली होती, तीच वेदना हेडने आपल्या खेळीने दिली.
Travis Head : कदाचित डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवणं कठीण आहे, परंतु विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव झाल्याने 140 कोटी भारतीयांसह संघाच्या स्वप्नाचा सुद्धा चक्काचूर झाला आहे. या विश्वचषकात अंतिम सामन्यापूर्वी अजिंक्य ठरलेल्या भारतीय संघाची अखेरच्या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी झाली नाही आणि तब्बल 12 वर्षांनंतर आपल्याच मातीत चषक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.
टीम इंडियाचे स्वप्न भंग करण्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हीस हेडनं मोला वाटा उचलला. त्याने नाबाद 137 धावांची खेळी करत जी वेदना 20 वर्षांपूर्वी टीम इंडियाला रिकी पाँटिंगने दिली होती, तीच वेदना हेडने आपल्या खेळीने दिली. हा तोच हेड आहे त्यानं रोहितचा अप्रतिम कॅच पकडून निम्मी मोहिम फत्ते केली होती. कसोटी अजिंक्यपद लढतीमध्येही हाच हेड भारतासाठी नडला होता. सेमीफायनलमध्येही त्याच्याच खेळीने ऑस्ट्रेलिया फायनलला पोहोचला होता. आता याच हेडची सात वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज शेन वाॅर्नने केलेली भविष्यवाणी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
हर्षा भोगलेंनी केलं ट्विट
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी वाॅर्नचे 2016 चे ट्विट रिट्विट करून हेडच्या प्रतिभेची आठवण करून दिली आहे. हर्ष भोगले ट्विट रिट्विट करत म्हणतात, व्वा, वाॅर्नी (शेन वाॅर्न) जे खेळाडू सामने खेचून आणतात, तेच तुला आवडतात. आणि ट्रॅव्हिस हेडनं करून दाखवलं आहे.
Wow, Warnie. You always liked players who took the game on. And Travis Head did https://t.co/hSyr4lZNad
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 20, 2023
हेडबद्दल वाॅर्न काय म्हणाला होता?
एक क्रिकेटपटू म्हणून मी हेडचा मोठा चाहता आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो भविष्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार असेल, याचा मला विश्वास आहे. आता वाॅर्नने वर्ल्डकप महामुकाबल्यामधील खेळी पाहता स्वर्गातून सलाम ठोकला असेल, यात शंका नाही. दरम्यान, गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज आपली छाप सोडू शकले नाहीत आणि 50 षटकात केवळ 240 धावाच करू शकले. ऑस्ट्रेलियाने 241 धावांचे लक्ष्य पूर्ण करत भारताचा 6 विकेट्स राखून दणदणीत पराभव केला.
भारतीय संघ 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता आणि समोर ऑस्ट्रेलिया होता. त्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून संपूर्ण देशाची निराशा केली होती. आता 20 वर्षांनंतर 2023 मध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले, पण निकाल पुन्हा तसाच राहिला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीला कामगिरी करता आली नाही. शुभमन गिल 4 धावा करून परतला. रोहित शर्मा (47) चांगला खेळत होता, पण हेडने घेतलेल्या शानदार झेलने त्यालाही माघारी धाडले. श्रेयस अय्यरलाही केवळ 4 धावा करता आल्या.
विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात 67 धावांची भागीदारी झाली. विराटने 54 धावांची तर केएल राहुलने 66 धावांची खेळी खेळली. मात्र हे अपुरे होते. इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. भारताने 11व्या ते 50व्या षटकांमध्ये फक्त 4 चौकार मारले. सूर्यकुमार यादवच्या आधी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, पण तोही केवळ 9 धावा करू शकला. सूर्याने फलंदाजी करत 18 धावांचे योगदान दिले. भारतीय संघही 50 षटकांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर विराजमान झाले, तर भारताचा पराभव झाला. यासह 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचा प्रवास संपला.
इतर महत्वाच्या बातम्या