'या' 10 भारतीय क्रिकेटपटूंची कारकीर्द 2024 मध्ये संपली! काही बँकांमध्ये काम करत आहेत, तर काही शेजारच्या देशात कॅप्टन
यावर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्यासह इतर अनेक भारतीयांनी 2024 मध्ये निवृत्ती घेऊन क्रिकेटला अलविदा केला.
10 Indian players careers end in 2024 : अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेलं 2024 वर्ष लवकरचनिरोप घेणार आहे आणि 2025 साठी दार ठोठावणार आहे. 2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहील. कारण यावर्षी भारतीय पुरुष क्रिकेट संघाने T-20 विश्वचषक जिंकून 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली. मात्र, यासोबतच हे वर्ष काही स्टार भारतीय खेळाडूंच्या निवृत्तीसाठीही लक्षात राहील. यावर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्यासह इतर अनेक भारतीयांनी 2024 मध्ये निवृत्ती घेऊन क्रिकेटला अलविदा केला.
चला जाणून घेऊया या सर्व क्रिकेटपटूंबद्दल
विराट कोहली
जागतिक क्रिकेटमध्ये 'किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच निवृत्ती जाहीर केली. तो फक्त T-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्त झाला. तो अजूनही कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. विराटने 125 टी-20 सामन्यांमध्ये 4188 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा
विराटसोबतच भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला विराम दिला होता. भारताला टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणे सुरू ठेवले आहे. त्याने 159 टी-20 सामन्यात 4231 धावा केल्या आहेत.
रवींद्र जडेजा
रोहित आणि विराटच्या यादीत भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही समावेश आहे. T20 वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर जडेजाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. मात्र, त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. जडेजाने भारतासाठी 74 टी-20 सामने खेळले आहेत.
केदार जाधव
भारतासाठी 9 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 73 एकदिवसीय सामने खेळलेल्या केदार जाधवने या वर्षी जूनमध्ये निवृत्ती जाहीर केली होती. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
सिद्धार्थ कौल
भारतासाठी तीन वनडे आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या सिद्धार्थ कौलनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 28 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा सिद्धार्थ आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहे.
वरुण आरोन
2011 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या वरुण आरोनने फेब्रुवारी 2024 मध्ये लाल चेंडू क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'मी 2008 पासून लाल चेंडूचे क्रिकेट खेळत आहे. मी वेगवान गोलंदाजी केल्यामुळे मला अनेक दुखापती झाल्या. आता मला समजले आहे की माझे शरीर मला या फॉरमॅटमध्ये वेगवान गोलंदाजी करण्यास परवानगी देणार नाही, म्हणून मी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनेश कार्तिक
केवळ फलंदाजीनेच नव्हे तर यष्टिरक्षणानेही चाहत्यांची मने जिंकणाऱ्या दिनेश कार्तिकने यावर्षी 1 जून रोजी आपल्या 39व्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कार्तिकने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे. तो आता कॉमेंट्री करताना दिसत आहे.
वृद्धिमान साहा
भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा यानेही यावर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा करत असल्याचं सांगितलं होतं. त्याने 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळले.
सौरभ तिवारी
आयपीएलमध्ये 93 सामने खेळलेला सौरभ तिवारी टीम इंडियासाठी 3 वनडे खेळला आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच सौरभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम दिला होता. तो सध्या लंका T10 सुपर लीगमध्ये 'नुवारा एलिया किंग्स' संघाचे नेतृत्व करत आहे.
शिखर धवन
भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवनने यावर्षी ऑगस्टमध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धवनने भारतासाठी 167 एकदिवसीय, 34 कसोटी आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या