आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा 'या' गोष्टीवरुन नाराज; चिंताही व्यक्त केली
टीम इंडियानं 237 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसरा टी-20 मोठ्या फरकाने जिंकेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. मोठी धावसंख्या असतानाही भारताने आफ्रिकेचा केवळ 16 धावांनी पराभव केला.
![आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा 'या' गोष्टीवरुन नाराज; चिंताही व्यक्त केली Team India captain Rohit Sharma statement on Death Overs after Ind vs SA india beat south africa by 16 runs आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा 'या' गोष्टीवरुन नाराज; चिंताही व्यक्त केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/07/6f890cbd77253d3a4e9999665b52176d1662525517146206_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ind vs sa t20 : भारतानं (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) दुसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकली आहे. टीम इंडियानं 237 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसरा टी-20 मोठ्या फरकाने जिंकेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. मोठी धावसंख्या असतानाही भारताने दक्षिण आफ्रिकेचा केवळ 16 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 3 गडी गमावून 221 धावा केल्या. पाहुण्या संघाकडून डेव्हिड मिलरने नाबाद शतक झळकावले. या सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. भारताने शेवटच्या 5 षटकात 78 धावा दिल्या, जे आगामी T20 विश्वचषकापूर्वी चिंतेचे मानले जात आहे. याच कारणामुळं भारताचा कर्णधार रोहित शर्मा मालिका जिंकूनही नाराज आणि चिंतेत असल्याचं दिसून आलं आहे.
गेल्या पाच-सहा सामन्यांमध्ये डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली नाही
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे पण कर्णधार रोहित शर्मा डेथ ओव्हर गोलंदाजीमुळे चिंतेत आहे. सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, 'गेल्या पाच-सहा सामन्यांमध्ये आम्ही डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केलेली नाही. विरोधी संघांविरुद्ध आम्ही त्याच त्या गोष्टीची पुनरावृत्ती करत आहोत. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणे आणि फलंदाजी करणे खूप कठीण आहे, कारण तिथेच सामन्याचा निर्णय होतो, असं रोहित म्हणाला.
रोहितकडून सूर्यकुमार यादवचं कौतुक
रोहित म्हणाला, 'बुमराहची दुखापत हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करण्यावर भर द्यावा लागेल. यावेळी रोहितने शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. 'सूर्यकुमारची फलंदाजीची शैली पाहून आम्ही विचार करत आहोत की आता त्याला 23 ऑक्टोबरलाच मैदानात उतरवायला हवे, असं तो म्हणाला. भारतीय संघाला 23 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामना खेळायचा आहे.
भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या दोन षटकांत 46 धावा दिल्या यावरुन खराब कामगिरीचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो. भारतीय संघाला काल पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासली. तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडला आहे.
मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माचा मोठा विक्रम
दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले. रोहित शर्मा (Rohit Sharma) सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. रोहित शर्माने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर संघाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासून संघाने त्याच्या नेतृत्वाखाली एकही T20 मालिका गमावलेली नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 11वी मालिका जिंकली. याआधी सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 10 टी-20 मालिका जिंकल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)