'त्या' हिंदू खेळाडूसोबत आमचे संघसहकारी भेदभाव करायचे, सोबत जेवायचे नाहीत; शोएब अख्तरचा खुलासा
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाबाबत एक मोठा खुलासा करुन खळबळ उडवून दिली आहे. शोएबने पाकिस्तानी संघाची एक काळी बाजू जगासमोर मांडली आहे.
कराची : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाबाबत एक मोठा खुलासा करुन खळबळ उडवून दिली आहे. शोएबने पाकिस्तानी संघाची एक काळी बाजू जगासमोर मांडली आहे. शोएबने असा दावा केला आहे की, आमचा जुना संघसहकारी दानिश कनेरियासोबत आमच्या संघातील काही खेळाडू भेदभाव करायचे. इतकेच नव्हे तर हे लोक दानिशसोबत जेवायचेसुद्धा नाहीत. त्याला एकमेव कारण होते की तो एक हिंदू आहे. पाकिस्तानमधील एका क्रीडावाहिनीशी बोलत असताना शोएबने हा दावा केला आहे. दरम्यान दानिश कनेरियानेदेखील शोएबने केलेला दावा खरा असल्याचे म्हटले आहे.
शोएब अख्तर म्हणाला की, भेदभावापूर्ण वागणुकीमुळे मी आमच्या संघातील दोन-तीन खेळाडूंशी भांडलो. संघामध्ये काही खेळाडू धर्म आणि प्रांतावरुन भेदभाव करु लागले होते. कोणी कराचीचा आहे, कोणी पंजाबचा आहे तर कोणी पेशावरचा, असा फरक करु लागले होते. धर्मावरुन भेदभाव सुरु होता. जर कोणी हिंदू आहे म्हणून काय फरक पडतो? जर तो देशासाठी खेळत असेल तर त्यात गैर काय? काही लोक म्हणायचे 'हा' माणूस इथून जेवण का घेतोय? इथे का जेवतोय? असे सवाल शोएबने उपस्थित केले.
शोएब म्हणाला की, त्याच हिंदूने (दानिशने) इंग्लंडविरोधात आम्हाला सामना जिंकून दिला होता. तो पाकिस्तानी संघासाठी खेळतोय. विरोधी संघामधील खेळाडूंच्या विकेट्स घेतोय. कनेरियामुळेच आम्ही इंग्लंडमधील ऐतिहासिक सिरिज जिंकलो होतो. परंतु काही लोक त्याचे श्रेय कनेरियाला देत नाहीत.
दरम्यान काही माध्यमांनी दानिश कनेरियासोबत संपर्क साधला. यावेळी कनेरिया म्हणाला की, शोएब एक महान खेळाडू आहे. तो गोलंदाज म्हणून एक चांगला खेळाडू आहेच, परंतु तो नेहमी खरं बोलतो. मी पाकिस्तानी टीमसाठी खेळत होतो तेव्हा मी या गोष्टींबद्दल फार बोलत नव्हतो. माझ्यात ती हिंमत नव्हती. परंतु आता शोएबच्या वक्तव्यानंतर माझ्यात ती हिंमत आली आहे. मी लवकरच त्यांची नावं जाहीर करेन. दानिश म्हणाला की, इंजी भाई (इंजमाम उल हक), मोहम्मद युसूफ आणि यूनिस भाई (यूनिस खान) या खेळाडूंनी नेहमीच माझी साथ दिली आहे.
दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू आहे. त्याच्याआधी त्याचा मामा अनिल दलपत हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळत होता. दानिशने 61 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 261 विकेट्स मिळवल्या आहेत.