(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शरद पवार एकटेच जिंकले, पण पॅनल पडलं; मुंबईतील 'या' निवडणुकीत दोन दशकांच्या वर्चस्वाला धक्का
Sharad Pawar Election : देशातील प्रतिष्ठित क्लब समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे.
मुंबई : मुंबईच नव्हे तर देशातील प्रतिष्ठित क्लब समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. गरवारे क्लब हाऊस मॅनेजमेंट कमिटी निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. डायनॅमिक पॅनलने शरद पवार यांच्या पॅनलला धोबीपछाड दिला आहे. मागील 20 वर्षांपासून पवार यांच्या पॅनलचे वर्चस्व होते.
गरवारे क्लबच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. पण त्यांचं पूर्ण पॅनल पराभूत झालं आहे. दक्षिण मुंबईत सर्वात मोठा क्लब आणि कोट्यवधींचा वार्षिक उलाढाल असलेल्या गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. 13 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड झाली. मात्र, मॅनेजमेंट कमिटीत शरद पवार पॅनलची एकही जागा निवडून आली नाही. डायनॅमिक पॅनलचे मनिष अजमेरा, मोहित चतुर्वेदी यांची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा सुरू आहे. डायनॅमिक पॅनलचे सायरस गोरिमार उपाध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
शरद पवार यांच्या पॅनलमध्ये भाजपचे माजी आमदार राज पुरोहित हेदेखील उभे होते. मात्र, त्यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या पॅनलमध्ये भाजपचे माजी आमदार राज पुरोहित हेदेखील उभे होते. मात्र, त्यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. राज पुरोहित हे मावळत्या कमिटीचे उपाध्यक्ष होते. शरद पवार डेव्हलपमेंट पॅनलचे नेतृत्वही राज पुरोहित यांच्याकडेच होते. पुरोहित हे मागील 30 वर्षांपासून क्लबशी जोडले गेले आहेत. डायनॅमिक पॅनेलचे मनीष अजमेरा खजिनदारपदी, तर मोहित चतुर्वेदी व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी सर्वाधिक मतांनी निवडून आले. पवार पॅनेलच्या या पराभवाचं श्रेय सायरस गोरिमार, मनीष अजमेरा आणि मोहित चतुर्वेदी यांना देण्यात येत असलं तरी त्यामागचा पॉलिटिकल ब्रेन कुणाचा आहे, याविषयी राजकीय निरीक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे.
विधानसभा अध्यक्ष आणि स्थानिक आमदार राहुल नार्वेकर हे देखील डायनॅमिक पॅनलच्या विजयात सहभागी झाले. त्यामुळे या पॅनलच्या रणनीतीमध्ये त्यांचाही सहभाग राहिला असल्याची चर्चा आहे.