RR vs KKR IPL 2021 Match Preview: मुंबईच्या वानखेडेवर राजस्थान-कोलकाता भिडणार, प्रत्येकी तीन पराभव झाल्याने दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक
RR vs KKR IPL 2021 Match Preview: आयपीएल 2021 मधील 18 सामना आज राजस्थान आणि कोलकाता संघादरम्यान होणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे.
Rajasthan vs Kolkata: आयपीएल 2021 मधील 18 सामना आज राजस्थान आणि कोलकाता संघादरम्यान होणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी चार-चार सामने खेळले असून केवळ एक-एक विजय मिळवला आहे तर प्रत्येकी तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशात दोन्ही संघ हा विजय मिळवण्यास उत्सुक असणार आहेत.कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आजवर 23 सामने झाले आहेत. यापैकी 12 सामने कोलकाताने तर 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत.
राजस्थानचे स्टार खेळाडू जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांची माघार तसेच लिआम लिव्हिंगस्टोन बायोबबलमधून बाहेर पडल्याने संघाच्या अडचणी वाढल्यात. राजस्थानला परवा बंगळूरुविरुद्ध 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थाननं केवळ दिल्लीला हरवलं आहे. पंजाबविरुद्ध 119 धावांची खेळी साकारणाऱ्या सॅमसनला आपला फार्म कायम ठेवता आलेला नाही. तर जोस बटलर, मनन व्होरा आणि डेव्हिड मिलर यांच्यासारखे फलंदाज अपयशी ठरले आहेत. गोलंदाजीत ख्रिस मॉरिस आणि मुस्ताफिझूर रेहमान यांनाही यश मिळवता आलेलं नाही.
दुसरीकडे कोलकाता संघाची स्थितीही खराब आहे. सलामीवीर शुभमन गिल, मॉर्गन यांना सूर गवसलेला नाही. गेल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिकला सूर गवसला आहे. सोबत गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी केलेल्या पॅट कमिंन्सनं फलंदाजीतलं कौशल्य दाखवलं आहे.