MS Dhoni | महेंद्रसिंह धोनी संघात कमबॅक कधी करणार? रवी शास्त्री म्हणातात...
धोनी स्वत:ला भारतीय संघावर लादणार नाही, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाचा सेमीफायनलचा सामना धोनीचा अखेरचा सामना होता.
मुंबई : क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघात कधी पुनरागमन करणार याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंह धोनीच्या कमबॅकबाबत महत्वाची गोष्ट सांगितली आहे. धोनीला संघात यायचं असेल त्यावेळी तो सांगेन. धोनी स्वत:ला संघावर लादणार नाही, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं.
एमएस धोनी महान खेळाडू आहे. मी धोनीला जवळून पाहिलं आहे. धोनी स्वत:ला भारतीय संघावर कधीच लादणार नाही. मला असं वाटतं, धोनी आधी आयपीएल खेळण्याची शक्यता आहे. धोनी जेवढं क्रिकेट खेळला आहे, त्यावरुन तो स्वत:ला ओळखतो. त्यामुळे आयपीएलमधील प्रदर्शानानंतर धोनीला वाटलं की आपण टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी फिट आहोत, तर तो तसं सांगेन. त्यानंतर कुणाला धोनीच्या निर्णयाला विरोध करण्याची गरजही लागणार नाही, असं रवी शास्त्रींनी म्हटलं.
निवड समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटलं होतं की, आता आमची नजर विकेटकीपर/फलंदाज म्हणून रिषभ पंतवर असणार आहे. धोनीलाही त्याच्या कमबॅकबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी त्याने जानेवारी 2020 पर्यंत मला माझ्या ब्रेकबद्दल विचारु नका, असं म्हटलं होतं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाचा सेमीफायनलचा सामना धोनीने खेळलेला शेवटचा सामना आहे. या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर झाली होती. विश्वचषकात धोनीच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. विश्वचषकानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी धोनीने आर्मी ट्रेनिंगला जाण्याचं कारण देत, वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता.
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्ये धोनी संघाचा भाग नव्हता. त्यामुळे धोनीच्या क्रिकेट करिअरबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र बीसीसीआय आणि धोनी याबाबत काय निर्णय घेणार आणि धोनी पुन्हा मैदानात कधी दिसणार याकडे क्रिकेट चाहत्यांचा लक्ष आहे.
धोनीने भारताला आपल्या नेतृत्त्वात 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यानंतर 2011 मध्ये तब्बल 28 वर्षानंतर धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं होतं. त्याआधी 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वात भारताने विश्वचषक जिंकण्याची कमाल केली होती.
VIDEO | TOP 25 | टॉप 25 न्यूज बुलेटिन | 10 डिसेंबर 2019