Vandana Katariya Hat-Trick : वंदना कटारियाचा विक्रम, ऑलिम्पिकमध्ये गोलची हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
Vandana Katariya Hat-Trick : भारतीय महिला संघाकडून वंदना कटारियानं आज एक नवा विक्रम केला. ऑलिम्पिकमध्ये गोलची गोलची हॅटट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं शानदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्याची हिरो ठरली ती भारताची वंदना कटारिया. वंदनानं सामन्यात तीन गोल करत एक नवा विक्रम केला आहे. भारतीय महिला संघाकडून वंदना कटारियानं आज एक नवा विक्रम केला. ऑलिम्पिकमध्ये गोलची गोलची हॅटट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेला 4-3 नं नमवत भारतीय महिला संघानं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. भारतानं याआधीच्या सामन्यात शुक्रवारी आयर्लंडला हरवलं होतं. भारतीय महिला हॉकी टीमच्या या विजयासह क्वार्टर फायनलच्या आशा जीवंत आहेत. मात्र आता भारताला आज सायंकाळच्या सामन्यात आयर्लंडच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघानं सामन्याची चांगली सुरुवात करत पहिल्या काही मिनिटातच गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात दक्षिण आफ्रिकेनं एक गोल करत बरोबरी केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं पुन्हा एक गोल करत आघाडी घेतली. मात्र पुन्हा दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या क्षणात गोल करत बरोबरी केली. त्यानंतर भारतीय संघानं पुन्हा तिसरा गोल करत आघाडी घेतली मात्र याच क्वार्टरमध्ये आफ्रिकेनं एक गोल करत पुन्हा 3-3 अशी बरोबरी केली. मात्र शेवटच्या क्वार्टरमध्ये वंदनानं आपला तिसरा आणि संघाचा चौथा गोल करत आघाडी मिळवून दिली.
कमलप्रीत कौरनं इतिहास रचला
डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटर स्कोर केला आहे. कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरली आहे. कमलप्रीत कौरनं फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. सोबतच ती पदकाची दावेदार देखील झाली आहे. डिस्कस थ्रो प्रकारात कमलप्रीत कौरनं कमालीची कामगिरी केली. ग्रुप बीमध्ये कमलप्रीत कौरनं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर स्कोअर केला. पहिल्या प्रयत्नात तिनं 60.25 मीटर स्कोअर करण्यात यशस्वी ठरली होती. दोन्ही ग्रुपमध्ये कमलप्रीत कौर आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आता ती फायनलमध्ये पोहोचली असून तिथं चांगली कामगिरी केल्यास भारताला अजून एक पदक मिळणं निश्चित आहे.
डिस्कस थ्रो- सीमा पूनिया बाहेर
डिस्कस थ्रोमध्ये भारताची सीमा पुनियाचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. सीमा पूनिया फायनलसाठी क्वालीफाय करु शकली नाही. क्वालिफिकेशन राउंडमध्ये सीमा पुनिया 16 व्या नंबरवर राहिली, यामुळं तिचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास थांबला आहे.
बॉक्सिंगमध्ये भारताला निराशा
बॉक्सिंगमध्ये भारताचा अमित पंघाल राउंड ऑफ 16 च्या रेसमधून बाहेर पडला आहे. अमितनं पहिला राऊंड जिंकला होता मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तो पराभूत झाला. अमित पंघालकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र त्याचा टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान या पराभवासह संपुष्टात आलं आहे.
तिरंदाजीत अतानू दासचं आव्हान संपुष्टात
तिरंदाजीमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा तिरंदाज अतानू दास राउंड ऑफ 16 मध्ये पराभूत झाला आहे. अतानु दास आणि जपानच्या खेळाडूमध्ये रंगलेला हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. शेवटच्या सेटमध्ये अतानूकडून एक चूक झाली आणि त्यानं सामना गमावला. अतानू दाससह भारताचे सर्व तीन तिरंदाज आधीच बाहेर गेले आहेत.
पीव्ही सिंधु पदक निश्चित करणार
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी महत्वाचा दिवस आहे. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू मैदानात उतरणार आहे तर बॉक्सिंगमध्ये पूजा राणीकडेही पदक निश्चित करण्याची संधी आहे. आज जर सिंधु तर ती फायनलमध्ये पोहोचेल आणि एक पदक निश्चित होईल.