Neeraj Chopra Exclusive : मिल्खासिंग आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं : नीरज चोप्रा
नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतरासह पहिले स्थान मिळवले. झेक प्रजासत्ताकचा याकूब वाल्देझ दुसऱ्या स्थानावर तर त्याच्याच देशाच्या विट्स्लाव व्हेसेलीने 85.44 मीटरसह कांस्यपदक मिळवले.
Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो दुसरा खेळाडू आणि पहिला अॅथलीट बनला आहे. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतरासह पहिले स्थान मिळवले. झेक प्रजासत्ताकचा याकूब वाल्देझ दुसऱ्या स्थानावर तर त्याच्याच देशाच्या विट्स्लाव व्हेसेलीने 85.44 मीटरसह कांस्यपदक मिळवले. भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासोबत एबीपी माझाने एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. यावेळी हे गोल्ड मेडल दिवंगत मिल्खासिंग यांना समर्पित करत असल्याचे नीरजने सांगितलं. मिल्खासिंग यांचं स्वप्न पूर्ण झालं पण आज ते नाहीत, असं त्याने म्हटलं.
प्रश्न - ऑलिम्पिकच्या ऐतिहासिक कामगिरीची सुरुवात कशी आणि कुठून झाली?
या विक्रमाची सुरुवात घरापासून झाली. त्यानंतर मैदानात सरावास सुरुवात केली त्यावेळी तेथे उपस्थित अनेक सिनियर्सकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. दरम्यान अनेकांनी सहकार्य केलं आणि बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. त्या सर्वांचे आभार.
प्रश्न - शेतकऱ्याचा मुलगा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकतो, कसं वाटतंय?
हा विजय गरजेचा होता. मी स्वत:ला भाग्यशाली मानतो की ही कामगिरी माझ्याकडून झाली आहे. आजच्या या गोल्ड मेडलमुळे सध्या जे स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा येऊ इच्छितात त्यांना प्रोत्साहन मिळेल. आम्ही देखील मेडल जिंकू शकतो असा विश्वास त्यांच्यात निर्माण होईल. देशातील तरुणाईला मेसेज देताना नीरजने म्हटलं की जे कराला ते मनापासून करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
प्रश्न - मिल्खासिंग यांना हे गोल्ड मेडल समर्पित केलं, काय आठवणी आहेत?
मिल्खासिंग यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राची उंची वाढवली, देशासाठी त्यांनी अनेक मेडल जिंकले. मिल्खासिंग यांचं एक स्वप्न होतं की ऑलिम्पिक अॅथलेटिक्समध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकावं. ऑलिम्पिकमध्ये त्यांचं मेडल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. मात्र त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे, पण ते आज आपल्यात नाहीत. आज ते जिथेही आहेत हे मेडल पाहून त्यांना आनंद होईल.
प्रश्न - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलं, काय म्हणाले?
भारतासाठी तुम्ही एक अविस्मरणीय आणि अभिमानस्पद क्षण दिला आहे. तुमच्या या ऐतिहासिक कामगिरी येणाऱ्या पिढीला नक्कीच उर्जा मिळेल. यावर नीरजनेही ऑलिम्पिक खेळांना सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींना केलं आहे.
नीरज चोप्रा कारकिर्द
नीरज चोप्रा हा भालाफेक स्पर्धेत भाग घेणारा भारतीय ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे. तो मूळचा पानिपत, हरियाणाचा आहे. अंजू बॉबी जॉर्ज नंतर जागतिक चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते.
2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 82.23 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. तर नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने 86.47 मीटर भाला फेकून स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.