(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swapnil Kusale: 'सर्व कागदपत्रे जोडूनही एक पैशाही मिळाला नाही'; ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेच्या मार्गदर्शकाची प्रतिक्रिया
Paris Olympics 2024 Maharashtra Athletes Swapnil Kusale: 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नील कुसाळे नेमबाजीचा सराव करतोय. पण नेमबाजीचा खेळ खार्चिक असतो.
Paris Olympics 2024 Maharashtra Athletes Swapnil Kusale: भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) काल झालेल्या सामन्यात इतिहास रचला आहे. स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा मान स्वप्नीलने मिळवला.
वडिलांनी कर्ज घेतलं-
2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नील नेमबाजीचा सराव करतोय. पण नेमबाजीचा खेळ खार्चिक असतो. रायफल, जॅकेट यांवर खर्च करावा लागतो. एका एका बुलेटसाठीही बरेच पैसे लागतात.एक काळ असा होता की सरावासाठी बुलेट्स खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे. पण वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं. सराव थांबू नये, यासाठी माझ्या वडिलांनी बँकेकडून कर्ज घेतलं आणि बुलेट्स खरेदीसाठी पैसे दिले. तेव्हा एक बुलेटची किंमत 120 रुपये असायची. त्यामुळे मी नेमबाजीचा सराव करताना प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरायचो. कारण अधिकचा खर्च परवडणारा नव्हता. मी जेव्हा या खेळासाठी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पुरेसं सामानही नव्हतं, असं स्वप्नीलने माध्यमांना सांगितलं होतं.
आम्हाला अजून एक पैशाही मिळालेला नाही-
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानूसार, पॅरिस ऑलम्पिकला जाण्याआधी महाराष्ट्र सरकारने स्वप्नीलला 50 लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते, आम्ही आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडूनही आम्हाला अजून एक पैशाही मिळालेला नाही, सरावाला स्वप्नीलला रोज 200 गोळ्यांची आवश्यकता असते आणि एक गोळी पन्नास रुपयांना मिळते. आज त्याने ब्राँझ जिंकले म्हणून कौतुक होतेय, पण जर सरकारी मदत वेळेवर मिळाली असती. तर आज चित्र अजून वेगळे असते, अशी प्रतिक्रिया स्वप्नील कुसाळेने मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी दिली.
ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर-
स्वप्नील कुसाळेच्या कामगिरीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 कोटी रुपयाचे पारितोषिक जाहीर केले आहे. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल, अशी माहिती एकनाथ शिदेंनी दिली. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मध्य रेल्वेने स्वप्नीलसाठी पेटारा उघडला-
स्वप्निल कुसाळे यांनी इतिहास रचलेला आहे. बहात्तर वर्षानंतर एका मराठी मुलाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळालेले आहे मात्र हा स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजन मध्ये टीसी म्हणून काम करतोय. यामुळेच मध्य रेल्वेसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस स्वप्निल हा पॅरिस हून भारतात येईल त्यावेळेस भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीस देखील जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता स्वप्निल हा मध्य रेल्वेचा एक ऑफिसर म्हणून यापुढे काम करेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी जाहीर केले आहे. तसेच मध्य रेल्वेची अंकिता ध्यानी ही देखील ऑलम्पिकसाठी पॅरिसला गेली असल्याने तिला देखील राम करण यादव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.