Maharashtra Kesari 2020 : कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी?
महाराष्ट्र केसरीच्या 63 व्या पर्वात मानाची गदा कोण उंचावणार हा प्रश्न राज्यातील कुस्तीप्रेमींना पडला आहे. परभणीचा गतविजेता महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि पुणे शहरचा 2017 सालचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यंदा पुन्हा किताबासाठी आमनेसामने उभे ठाकणार का? ही या परवाची मोठी उत्सुकता आहे.
पुणे : पुण्यातलं महाराष्ट्र शासनाचं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झालंय ते महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या 63 व्या अधिवेशनासाठी. परभणीचा गतविजेता महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि पुणे शहरचा 2017 सालचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यंदा पुन्हा किताबासाठी आमनेसामने उभे ठाकणार का? हीच या अधिवेशनाची मोठी उत्सुकता आहे. राज्यातल्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी किताब हा सर्वात प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे सध्याच्या राजकीय कुस्त्यांइतकंच साऱ्या राज्याचं लक्ष हे पुण्यातल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्त्यांवरही राहील.
बाला रफिक शेखनं महाराष्ट्र केसरी किताब जिंकला, त्याला आता वर्ष झालं आहे. पण अभिजीत कटकेच्या मनातली पराभवाची जखम अजूनही ओली आहे. अभिजीतने 2017 साली भूगावात किरण भगतला हरवून महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. त्यानंतर जालन्यात त्याचं आव्हान कुणाला पेलवणार? असा प्रश्न होता. पण बाला रफिक शेखनं कमाल केली, त्यानं अभिजीत कटकेवर बाजी उलटवली. मराठवाड्यातल्या जालन्यातून महाराष्ट्र केसरीचा रथ आता पुण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे सवाल हा आहे की, अभिजीत कटके घरच्या रणांगणात महाराष्ट्र केसरीचा किताब पुन्हा जिंकणार, की बाला रफिक लागोपाठ दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावणार?
पुण्याच्या शिवरामदादा तालमीचा पठ्ठ्या आणि पैलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचा लेक अशी ओळख असलेला अभिजीत यंदाच्या मोसमात फॉर्मात आहे. अभिजीतने खुल्या गटाच्या राष्ट्रीय कुस्तीत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. या कामगिरीनं त्याचा आत्मविश्वास आणखी दुणावलाय. तेवीस वर्षांखालील आशियाई विजेतेपद आणि सीनियर विश्वचषकातल्या सहभागाचा अनुभव त्याच्या गाठीशी जमा झाला आहे. नजिकच्या काळात आंतरराष्ट्रीय आव्हानाला सामोरं जाण्याआधी, अधिकाधिक पैलवानांशी खेळण्याचा अनुभव गाठीशी असावा म्हणून अभिजीत पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात दाखल झालाय.
गतवर्षी अभिजीतला महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत बाला रफिक शेखकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा पुण्यातल्या घरच्या रणांगणात त्या पराभवाची परतफेड करण्याची त्याला संधी आहे.
महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती ही माती आणि मॅट विभागांमधल्या विजेत्या पैलवानांमध्ये खेळवण्यात येते. मातीतून यंदाही गतविजेत्या बाला रफिक शेखचं आव्हान तगडं आहे. महाराष्ट्र केसरीत बाला रफिक परभणीकडून खेळत असला तरी, तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या खडकी गावचा पैलवान आहे. मूळचा गणपतराव आंदळकरांचा हा चेला सध्या पुण्यातल्या हनुमान आखाड्यात वस्ताद गणेश दांगट आणि गणेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कसतो आहे.
बाला रफिक शेखचा समावेश असलेल्या माती विभागात वाशिमचा सिकंदर शेख, सोलापूरचा माऊली जमदाडे, जालन्याचा विलास डोईफोडे, सांगलीचा मारुती जाधव, पुणे जिल्ह्याचा मुन्ना झुंझुरके यांच्या कामगिरीकडेही कुस्तीतल्या जाणकारांची नजर असेल.
अभिजीत कटकेचा समावेश असलेल्या मॅट विभागात नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, लातूरचा सागर बिराजदार, हिंगोलीचा गणेश जगताप, पुणे जिल्ह्याचा आदर्श गुंड आदी पैलवान यंदा चांगलेच तयारीत आहेत. त्यामुळे अभिजीत कटकेला किताबाच्या फायनलमध्ये धडक मारण्याआधी कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र केसरीच्या 63 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातली कुस्ती कात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. रुस्तम ए हिंद अमोल बुचडे आणि कुस्तीगीर परिषदेतल्या नव्या दमाच्या टीमने महाराष्ट्र केसरीचं शिवधनुष्य यंदा आपल्या खांद्यावर घेतलं आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्याची जबाबदारी मराठी मुलुखातल्या पैलवानांवर राहील.