आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकाताचा हैदराबादवर सहा विकेट्सने विजय
आयपीएलच्या बाराव्या सीजनची कोलाकाने विजयी सुरुवात केली आहे. आंद्रे रसेलच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने हैदराबादवर सहा विकेट्सने विजय मिळवला आहे.
कोलकाता : आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या सलामीच्या सामन्यात हैदराबादवर सहा विकेट्स राखून विजय साजरा केला. या सामन्यात हैदराबादनं कोलकासमोर विजयासाठी 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
हैदराबादनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सोळाव्या षटकांत चार बाद 118 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर आंद्रे रसेलनं अवघ्या 19 चेंडूत चार षटकार आणि चार चौकारांसह 49 धावा फटकावून कोलकात्याला सनसनाटी विजय मिळवून दिला. त्याआधी नितीश राणानं 68 आणि रॉबिन उथप्पानं 35 धावांची खेळी करुन कोलकात्याच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हैदराबादकडून शाकिब अल हसन, संदीप शर्मा, सिद्धार्थ आणि राशिद खानने एक-एक विकेट घेतली.
त्याआधी डेव्हिड वॉर्नरच्या दमदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 3 बाद 181 धावांची मजल मारली. तब्बल दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरनं 85 धावांची खेळी केली. त्यानं जॉनी बेअरस्टोच्या साथीनं सलामीच्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी रचली. बेअरस्टोनं 35 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. तर त्यानंतर आलेल्या विजय शंकरनं 24 चेंडूत नाबाद 40 धावा कुटल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलने दोन तर पियुष चावलाने एक विकेट घेतली.