एक्स्प्लोर
Advertisement
'फुलराणी' सायनाच्या मनात जब जब फुल खिले...
भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांची सोशल मीडियावर व्हायरल झालेली छायाचित्रं पाहून दोघं डेटिंग करत असल्याची चर्चा रंगली आहे
मुंबई : भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल आता 28 वर्षांची झाली. भारताच्या सुदैवानं आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये ती अजूनही एक आव्हान बनून उभी आहे. पण त्याच वेळी सायनाच्या वैयक्तिक आयुष्यात एक गोड घडामोड होत असल्याची कुणकुण सोशल मीडियावरुन लागत आहे. आता हे खरं की खोटं, ते सायनाच सांगू शकते.
सायना नेहवाल किंवा भारताचा बॅडमिंटनवीर पारुपल्ली कश्यपची सोशल मीडियावर व्हायरल झालेली छायाचित्रं खरं तर खूप काही सांगून जातात... पण त्या दोघांनी अजूनही आपल्यातल्या नात्याविषयी एक चकार शब्द काढलेला नाही.
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या दोघांमधल्या मैत्रीची तुम्हा-आम्हा साऱ्यांनाच कल्पना होती. पण सध्या सोशल मीडियावर गॉसिपिंग सुरु आहे ते दोघांमधल्या मैत्रीच्या नात्याला प्रेमाचं कोंदण मिळाल्याचं. त्याचं कारण आहे सायनानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली दोघांची छायाचित्रं. ही छायाचित्रं हैदराबादमधल्या रेस्टॉरंटमधली आहेत. त्यामुळे त्या दोघांचं डेटिंग सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे.
विशेष सांगायचं म्हणजे सायना नेहवालच्या हजारो चाहत्यांना तिनं पारुपल्ली कश्यपसोबत जमवलेली जोडीही पसंत पडली आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिला थम्स अपचा सिम्बॉल पाठवून, 'गो अहेड'चा संदेश दिला आहे. कुणीकुणी तर सायनाला कश्यपसोबत थेट लग्नाचा सल्ला दिला आहे.
सायनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिची आणि पारुपल्ली कश्यपची छायाचित्रं काही नवी नाहीत. पण आधीची छायाचित्रं ही मित्रमैत्रिणींसोबतची असायची. सध्याच्या छायाचित्रांमध्ये मात्र कुछ खास असल्याचं पाहताक्षणी जाणवतं.
2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकची कांस्यविजेती सायना आणि 2014 सालच्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता पारुपल्ली कश्यप हे दोघंही हैदराबादचेच आहेत. बॅडमिंटन आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद हाही त्यांना जोडणारा समान दुवा आहे. गोपीचंद यांच्या अॅकॅडमीत गेली अनेक वर्षे एकत्र सराव करून त्यांच्या मैत्रीचं नातं निर्माण झालं. भारतीय संघातून सतत एकत्र दौऱ्यावर राहून त्यांच्यातल्या मैत्रीला एकमेकांविषयीच्या विश्वासाचंही बळ मिळाल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. आता नजीकच्या काळात सायना आणि कश्यपचं पुढचं पाऊल काय असेल, याविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
अर्थात भारतीय बॅडमिंटनला अशा जोडीचं नावीन्य नाही. सायना आणि कश्यपचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि त्यांच्या पत्नी पीव्हीव्ही लक्ष्मी यांच्या प्रेमसंबंधांची एका जमान्यात अशीच चर्चा झाली होती. प्रकाश पडुकोण यांच्यानंतर गोपीचंद यांनी 2001 साली ऑल इंग्लंड जिंकण्याचा मान मिळवला होता. पीव्हीव्ही लक्ष्मी यांचीही ख्याती मोठी होती. 1996 साली ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला बॅडमिंटनपटू ठरल्या होत्या. गोपीचंद आणि लक्ष्मी यांनी 2002 साली लग्नगाठ बांधली होती. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप आपल्या कारकीर्दीच्या कोणत्या टप्प्यावर तो निर्णय घेतात याविषयी बॅडमिंटन चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
भविष्य
क्रिकेट
Advertisement