Hardik Pandya : ... तर तुम्ही चाहत्यांची मनं जिंकाल, हार्दिक पांड्याला भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा कानमंत्र
Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या करतोय. हार्दिक पांड्याला यावेळी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
मुंबई: टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खान (Zaheer Khan) यानं सध्या सुरु असलेल्या आयपीएलसंदर्भात (IPL 2024) विविध मुद्यांवर भाष्य केलं. झहीर खाननं रिषभ पंत, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि इम्पॅक्ट प्लेअर नियम यासंदर्भात झहीर खाननं भूमिका मांडली. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यासोबत जो प्रकार घडतोय त्या संदर्भात देखील झहीर खाननं भाष्य केलं. हार्दिक पांड्यानं प्रेक्षकांकडून होणाऱ्या शेरेबाजीतून कसा मार्ग काढावा याबाबत एक सल्ला देखील झहीर खाननं दिला आहे.
झहीर खाननं हार्दिक पांडयाला सल्ला देताना म्हटलं की त्यानं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हार्दिक पांड्यानं अशा बाबींकडे दुर्लक्ष करुन चांगली कामगिरी करुन उत्तर दिल्यास या सर्व गोष्टी बदलून लोक त्याच्या बाजूनं उभे राहतील, असं झहीर खान म्हणाला.
झहीर खान पुढे म्हणाला की, हार्दिक पांड्यासोबत जे घडतंय त्यावरुन असं दिसून येतं की भारतात फ्रँचायजी क्रिकेटचा विकास होत आहे. चाहते भावनिक असतात , त्यांना भावना व्यक्त करायच्या असतात. जेव्हा एखादा खेळाडू देशाचं प्रतिनिधीत्व करेल त्यावेळी या सर्व गोष्टी सामान्य होतील, असं झहीर खान यानं म्हटलं.
प्रत्येक खेळाडूनं या गोष्टी लक्षात ठेवाव्यात की तुम्ही जितक्या ट्रॉफी जिंकाल, तुम्ही ज्या प्रकारे परफॉरमन्स दाखवाल, तुमचं समर्पण किती आहे. त्याआधारे तुम्ही चाहत्यांची मनं जिंकू शकता, असं झहीर खान म्हणाला.
रिषभ पंतला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळावी
झहीर खान आगामी टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात बोलताना म्हटलं की रिषभ पंतला संघात संधी मिळाली पाहिजे. रिषभ पंत ज्या प्रकारे कामगिरी करतोय, त्याच्या कामगिरीतील सुधारणा पाहून आनंदी आहे. रिषभ पंतनं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवत या खेळापासून दूर गेला नसल्याचं दाखवून दिलं आहे. टीम इंडियात मधल्या फळीत चांगली फलंदाजी करणाऱ्या विकेटकीपर बॅटसमनची गरज असल्याचं झहीर खाननं म्हटलं.
मोहम्मद शमी सध्या दुखापतग्रस्त असल्यानं त्याच्या जागी वर्ल्डकपमध्ये मोहम्मद सिराजला संधी मिळाली पाहिजे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह दोघे भारताच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील, असं झहीर खान म्हणाला. अर्शदीप सिंग, मोहसीन खान, खलील अहमद, यश दयाल हे देखील चांगली कामगिरी करत असल्याचं झहीर खाननं म्हटलं.
दरम्यान, मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात सातपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर