न भूतो न भविष्यति, IPL च्या इतिहासात हैदराबाद पहिलाच, फक्त 58 चेंडूत 166 धावांचं लक्ष्य पार
SRH vs LSG : सनरायझर्स हैदराबादनं लखनौ सुपर जायंट्सचा तब्बल 62 चेंडू आणि दहा विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या रणांगणात आपली ताकद पुन्हा दाखवून दिली.
SRH vs LSG : सनरायझर्स हैदराबादनं लखनौ सुपर जायंट्सचा तब्बल 62 चेंडू आणि दहा विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या रणांगणात आपली ताकद पुन्हा दाखवून दिली. या सामन्यात लखनौनं हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडनं हैदराबादला नऊ षटकं आणि चार चेंडूंत विजयी लक्ष्य गाठून दिलं. त्या दोघांनी सलामीला 167 धावांची अभेद्य भागीदारी रचली. अभिषेक शर्मानं 28 चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 75 धावांची खेळी उभारली. ट्रॅव्हिस हेडनं 30 चेंडूंत आठ चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 89 धावांची खेळी केली. हैदराबादचा हा बारा सामन्यांमधला सातवा विजय ठरला. या विजयानं हैदराबादच्या खात्यात 14 गुण झाले असून, आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगावान धावांचा पाठलाग केला आहे. टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम हैदराबादच्या नावावर जमा झालाय.
न भूतो न भविष्यति
सनरायजर्स हैदराबादने न भूतो न भविष्यति अशी कामगिरी केली आहे. हैदराबादने फक्त 58 चेंडूमध्ये 166 धावांचा पाऊस पाडला. आयपीएलच्या इतिहासात 160 धावांपेक्षा जास्त धावांचा पाठलाग 10 पेक्षा कमी षटकात पार करण्याची पहिलीच वेळ ठरली. हैदराबादची नोंद आता इतिहासात झाली आहे. हैदराबादच्या झंझावती फलंदाजीपुढे लखनौची गोलंदाजी फिकी पडली. लखनौचा कर्णधार केएल राहुलही अवाक झाला, सामन्यानंतर त्यानं आशा फलंदाजीबद्दल माझ्याकडे शब्द नसल्याचे म्हटले आहे.
SRH CHASED DOWN FASTEST 160+ TOTAL IN IPL HISTORY. 🤯
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2024
- Head and Abhishek, the beasts. 💪pic.twitter.com/QD9mvZzGiL
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगावान पाठलाग -
आयपीएलच्या इतिहासात हैदराबादने सर्वात वेगवान पाठलाग केला आहे. याआधी हा विक्रम डेक्कन चार्जस संघाच्या नावावर होता. डेक्कन चार्जस हैदराबाद संघाने मुंबईविरोधात 12 षटकात 155 धावांचा पाठलाग केला होता. 2008 चा हा विक्रम आजपर्यंत कायम होता. यंदा हा विक्रम मोडीत निघाला. राजस्थान रॉयल्सने 2023 मध्ये 13.1 षटकात 150 धावंचा पाठलाग केला होता. 2008 मध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नईविरोधात 13.5 षटकात 157 धावांचा पाठलाग केला होता. हे सर्व विक्रम आता हैदराबादच्या फलंदाजीसमोर खुजे वाटत आहेत. हैदराबादने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचलाय.
SRH BECOMES THE FIRST TEAM IN IPL HISTORY TO CHASE DOWN 160+ TOTAL INSIDE 10 OVERS. 🤯 pic.twitter.com/LQUpXVvvWs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2024