(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli : विराट कोहली आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मध्ये,टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याचा फायदा घ्या, सौरव गांगुलीनं सांगितली मोठी गोष्ट
Virat Kohli : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडिया वर्ल्डकप जिंकू शकते, असं देखील तो म्हणाला.
बंगळुरु : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) विराट कोहलीबाबत (Virat Kohli) मोठा सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या व्यवस्थापनाला सौरव गांगुलीनं महत्त्वाची सूचना दिली. विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीला टीम इंडियानं सलामीला फलंदाजीला पाठवावं, असा सल्ला गांगुलीनं दिला.
विराट कोहलीनं आयपीएलमध्ये 12 मॅचमध्ये 153.51 च्या स्ट्राइक रेटनं आणि 70.44 च्या सरासरीनं 634 धावा केल्या आहेत. विराट कोहलीचं हे स्ट्राइक रेट त्याच्या करिअरपेक्षा 134.31 पेक्षा अधिक आहे.
गांगुलीनं म्हटलं की, विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीनं पंजाब किंग्ज विरुद्ध 92 धावांची खेळी केली होती. विराटची आयपीएलमधील कामगिरी लक्षात घेता त्याला टी-20 वर्ल्डकपमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली पाहिजे. विराट कोहलीच्या आयपीएलमधील काही डावातील फलंदाजीकडे पाहिलं असता ते अद्भूत आहे. त्यामुळं विराट कोहलीनं टी-20 वर्ल्डकपमध्ये डावाची सुरुवात करावी, असं गांगुली म्हणाला.
भारतानं यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संतुलित टीमची निवड केलेली आहे. भारताकडे 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे, असं गांगुली म्हणाला.
टीम इंडियाचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे यानं देखील विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. कुंबळे म्हणाला की विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये आयपीएलमध्ये शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे, त्याला या आयपीएलमध्ये ब्रेक मिळाला आहे, असं अनिल कुंबळे म्हणाला.
विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप, आरसीबीचं आयपीएल आव्हान कायम
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीनं दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑरेंज कॅपवर कब्जा ठेवला आहे. विराट कोहलीनं 12 मॅचमध्ये 634 धावा केल्या आहेत. दुसरीकडे आरसीबीनं सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर कमबॅक केलं आहे. सलग चार विजयांसह त्यांनी एकूण पाच मॅच जिंकल्या आहेत. आरसीबीकडे सध्या 10 गुण असून गुणतालिकेत ते सातव्या स्थानावर आहेत. आयपीएलच्या प्लेऑफमधील प्रवेशाचा आरसीबीचा मार्ग सध्या तरी बंद झालेला नाही. आरसीबीनं पुढील दोन मॅच जिंकल्या तरी त्यांना प्लेऑफमधील प्रवेशासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहायला लागणार आहे.
1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु
आगामी 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तान आयपीएलमध्ये एकाच गटात आहेत. दोन्ही संघ 9 जूनला आमने सामने येणार आहेत.