क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या खांद्यावर यशस्वी ऑपरेशन, पुनरागमन करणार का?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटलचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्यावर यशस्वी ऑपरेशन झाले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा मध्यम ऑर्डर फलंदाज आणि इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटलचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या खांद्यावर यशस्वी ऑपरेशन झाले. शस्त्रक्रियेनंतर त्याने स्वत: चा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अय्यर याने आपल्या पोस्टमध्ये लिहलंय, की "ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि मी शक्य तितक्या लवकर पूर्ण वचनबद्धतेसह परत येईल. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद."
इंग्लंडविरुद्ध खेळताना दुखापत
23 मार्च रोजी पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जॉनी बेअरस्टोचा शॉट रोखण्याच्या प्रयत्नात 26 वर्षीय अय्यर जखमी झाला होता. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांमधून आणि आयपीएल 2021 मधूनही तो बाहेर गेला.
अय्यर याच्या जागी ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी
अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समोर आले. अय्यरला पुन्हा मैदानावर परतण्यास सुमारे चार महिने लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Surgery was a success and with lion-hearted determination, I’ll be back in no time 🦁 Thank you for your wishes 😊 pic.twitter.com/F9oJQcSLqH
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) April 8, 2021
काउन्टी क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकणार नाही
अय्यर जुलैमध्ये इंग्लंडमधील काऊन्टी क्रिकेटमध्ये भाग घेणार होता. वास्तविक, काऊन्टी टीम लँकशायरने रॉयल लंडन वनडे कपसाठी त्याला साइन केले होते. पण, आता असे मानले जात आहे की अय्यर याला या स्पर्धेत भाग घेणे अवघड आहे. कारण क्रिकेटच्या मैदानात परत येण्यास त्यांना बराच काळ लागेल.
श्रेयस अय्यरनंतर दिल्ली आणखी एक धक्का
अवघ्या काही दिवसांनीच म्हणजेच 9 एप्रिलपासून इंडियन प्रिमीयर लीग, अर्थात आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. पण, क्रिकेटचा महाकुंभ सुरु होण्यापूर्वीच यामध्ये सहभागी झालेल्या दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण, संघातील ऑलराऊंडर म्हणून ओखळ असणारा खेळाडू अक्षर पटेल याला कोरोनाची लागण झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं.
दिल्ली कॅपिटल्स संघाशी संलग्न सुत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार अक्षर पटेलला दुर्दैवानं कोरोनाची लागण झाली असून, आता तो विलगीकरणात आहे. तसंच सर्व नियमांचं पालनही करत आहे.
10 एप्रिलला दिल्लीचा पहिला सामना
आयपीएल 2021 मध्ये दिल्लीच्या संघाचा पहिला सामना, 10 एप्रिलला होणार आहे. चेन्नईच्या संघाविरोधात हा सामना खेळला जाणार असल्याचं कळत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे हा सामना पार पडेल. पण, या सामन्याला अक्षर पटेल मात्र अनुपस्थित असणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.