RR vs RCB : जाणून घ्या राजस्थानच्या पराभवाची तीन कारणे
RR vs RCB, IPL 2023 : करो या मरो या लढतीत आरसीबीने राजस्तानचा ११२ धावांनी पराभव केला.
RR vs RCB, IPL 2023 : करो या मरो या लढतीत आरसीबीने राजस्तानचा ११२ धावांनी पराभव केला. आरसीबीच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी हराकिरी केली. राजस्थानचा डाव अवघ्या 59 धावांत संपुष्टात आला. हेटमायरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने झुंज दिली नाही. 172 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 10.3 षटकात 59 धावांत संपुष्टात आला. वेन पार्नेल याने तीन विकेट घेतल्या.. आरसीबीने एकतर्फी विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. आरसीबीच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. त्याशिवाय फक्त दोन फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली. राजस्थानचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. राजस्थानचे प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी फक्त ११ टक्के आहे. राजस्थानच्या दारुण पराभवाची अनेक कारणे आहेत.. त्यापैकी प्रमुख तीन कारणे जाणून घेऊयात...
सुरुवातीला विकेट काढण्यात अपयश -
नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजांना आरसीबीच्या फलंदाजांना सुरुवातीलाच बाद करण्यात अपयश आले. पहिल्या दोन मोठ्या भागिदारीच्या जोरावर आरसीबीने १७१ पर्यंत मजल मारली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी संयमी फलंदाजी केली. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. मॅक्सवेल आणि फाफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागिदारी केली. राजस्थानच्या गोलंदाजांना सुरुवातीला विकेट काढण्यात अपयश आले.
अखेरच्या षटकात खराब गोलंदाजी -
राजस्थानच्या गोलंदाजांनी सरुवातीला विकेट घेतल्या नाहीत. मधल्या काही षटकात झटपट विकेट घेत राजस्थानने कमबॅक केले. पण अखेरच्या षटकात आरसीबीच्या फलंदाजांनी धावा चोपल्या. १८ व्या षटकात मॅक्सवेल बाद झाला तेव्हा आरसीबीची धावसंख्या १३७ इतकी होती. त्यानंतर अखेरच्या १५ चेंडूत आरसीबीने ३४ धावा काढल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना डेथ ओव्हरमध्ये धावा रोखता आल्या नाहीत. त्यामुळे आरसीबीने १७१ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ झाल्यामुळे ही मोठी धावसंख्या होती.
फलंदाजाची हराकिरी, पावरप्लेमध्येच मानली हार
१७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांना खातेही उघडता आले नाही. इथकेच काय कर संजू सॅमसनही चार धावा काढून बाद झाला. पहिल्या पाच षटकात राजस्थानचा अर्धा संघ तंबूत परतला. झटपट विकेट जात असताना राजस्थानचा एकाही फलादांजाने संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही. राजस्थानने पहिल्या सहा षटकातच हार मानली होती. पावरप्लेमध्ये राजस्थानची अवस्था पाच बाद २८ धावा इथकीच होती. इथेच राजस्थानच्या संघाने पराभव मानला होता. सलामी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर संजू सॅमसन याने संयमी फलंदाजी करायला हवी होती. संजू सॅमसन याला फटका मारण्याची गरज नव्हती. संजू सॅमसन याने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट फेकली. संजू सॅमसन आणि जो रुट या अनुभवी फलंदाजांनी राजस्थानचा डाव सावरण्याची गरज होती. पण त्यांनी विकेट फेकली.