Rinku Singh : मिशेल स्टार्कला 24.75 कोटी तुला फक्त 55 लाख मिळतात, अवघड प्रश्नावर रिंकूचं लाखमोलाचं उत्तर
Rinku Singh : आयपीएलमध्ये केकेआरकडून मिशेल स्टार्कला 24.75 कोटी आणि तुला 55 लाख रुपये मिळतात असा प्रश्न रिंकू सिंगला विचारण्यात आला होता.
नवी दिल्ली: टीम इंडियाचा युवा खेळाडू आणि आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या रिंकू सिंगची (Rinku Singh) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रिंकू सिंगची टीम इंडियाच्या (Team India) राखीव खेळाडूंच्या यादीत वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे. केकेआरनं आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर रिंकू सिंगनं एका मुलाखतीत विविध विषयांवर चर्चा केली. रिंकू सिंग टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला आज रवाना होणार आहे. आयपीएलचं सतरावं पर्व रिंकू सिंगसाठी निराशाजनक ठरलं आहे. रिंकू सिंगला आयपीएलमध्ये मिळणाऱ्या मानधनाबाबत विचारण्यात आलं असता त्यानं लाखमोलाचं उत्तर दिलं.
आयपीएलमध्ये मिशेल स्टार्कला (Mitchell Starc) 24.75 कोटी रुपये मिळतात अन् तुला 55 लाख रुपये मिळतात असा प्रश्न रिंकू सिंगला विचारण्यात आला होता. रिंकू सिंगनं जेवढे पैसे मिळतात त्यात समाधानी असल्याचं म्हटलं. दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत रिंकू सिंगला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. रिंकून आयपीएलमधील मानधनाबाबत बोलताना म्हटलं की 50-55 लाख देखील खूप होतात, जेव्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती त्यावेळी इतके पैसे कमवू असा विचार केला नव्हता. ज्यावेळी लहान मुलं होतो, त्यावेळी 5-10 रुपये मिळायचे ते कसेही मिळावेत, असं वाटायचं. आता 55 लाख मिळतात हे खूप आहेत. देव जितकं देतोय त्यामध्ये खुश राहिलं पाहिजे, असं माझं मतं असल्याचं रिंकू सिंग म्हणाला.
रिंकू सिंग म्हणाला की मला असं कधीही वाटलं नाही की मला इतकेच किंवा तितकेच रुपये मिळावेत. आता 55 लाख मिळतात मी खूश आहे. जेव्हा पैसे मिळत नव्हते तेव्हा पैशांचं मूल्य कळत होतं, असं रिंकू सिंग म्हणाला.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाबाबत रिंकूला काय वाटतं?
रिंकू सिंगनं याच मुलाखतीत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाबद्दल देखील भाष्य केलं. रोहित शर्मा कॅप्टन म्हणून किती चांगला आहे ते सर्व जगाला माहिती आहे. व्यक्तिगत पातळीवर विचारत असाल तर मी रोहित शर्मासोबत केवळ एक दौरा केला आहे. माझी त्याच्याशी अधिक चर्चा झाली नाही. रोहित युवा खेळाडूंना सहकार्य करतो. युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी, यासाठी तो प्रोत्साहन देत असतो.
दरम्यान, रिंकू सिंग विमानानं आज अमेरिकेला रवाना होणार आहे. रिंकू सिंग टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाचा राखीव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्याला यंदाच्या पर्वात समाधानकारक कामगिरी करता आली नाही. याचाच फटका रिंकू सिंगला बसला आहे. रिंकू सिंगसाठी गेल्या वर्षीचं पर्व चांगलं ठरलं होतं.
संबंधित बातम्या :