IPL 2024 : अश्विननं दिवस गाजवला पण बॅटिंगनं, रोहित शर्मा स्टाइल फटकेबाजी, थँक्स अश्विन अण्णा, राजस्थानचं विशेष ट्विट
R. Ashwin : राजस्थान रॉयल्सनं आयपीएलमध्ये दुसरा विजय मिळवला आहे. राजस्थाननं 185 धावा केल्या होत्या. त्यामध्ये रविचंद्रन अश्विनच्या 29 धावा महत्त्वाच्या ठरल्या.
जयपूर : आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) पर्वात पहिल्या विजयाच्या आशेनं उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals ) दुसऱ्या मॅचमध्येही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव झाला आहे. रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्लीनं मॅचच्या सुरुवातीला राजस्थानच्या बॅटिंगला नियंत्रणात ठेवलं होतं. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) 3 बाद 36 धावा झाल्या होत्या.मात्र, आर. अश्विन आणि रियान पराग यांच्या फलंदाजीमुळं राजस्थाननं 3 बाद 185 धावा केल्या. रियान परागनं 84 धावा केल्या मात्र त्याच्यासोबत आर. अश्विननं (R.Ashwin) केलेल्या 29 धावा देखील महत्त्वाच्या ठरल्या.
आर. अश्विननं कुलदीप आणि नॉर्खियाला धुतलं
दिल्लीच्या टीमनं राजस्थानची अवस्था 3 बाद 36 अशी केली होती. यावेळी राजस्थाननं एक चाल खेळली. यावेळी त्यांनी आर. अश्विनला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं. आर. अश्विननं 19 बॉलमध्ये 29 धावा केल्या. यामध्ये अश्विननं कुलदीप यादवला 1 सिक्स मारला. यानंतर नॉर्खियाला देखील दोन सिक्स मारत आर. अश्विननं आपली क्षमता दाखवून दिली.
आर. अश्विनची फटकेबाजी पाहून अनेकांना सुखद धक्का
राजस्थान रॉयल्समध्ये आर. अश्विनवर प्रामुख्यानं स्पिन बॉलिंगची धुरा आहे. मात्र, टीम मॅनेजमेंटनं त्याला कालच्या मॅचमध्ये वरच्या क्रमांकावर पाठवलं होतं. अश्विननं कुलदीप यादव आणि एनरिच नॉर्खियाला मारलेल्या तीन सिक्सरनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
आर. अश्विनची फटकेबाजी पाहा व्हिडीओ
अश्विन आणि रियान पराग यांच्या 54 धावांच्या भागिदारीनं राजस्थान रॉयल्सचा डाव सावरला. रियान परागनं 84 धावा केल्या. रियान परागनं 7 चौकार आणि 6 सिक्स मारले. रियान परागनं सुरुवातीला अश्विन, ध्रुव जुरेल आणि हेटमायर यांच्यासोबत केलेल्या भागिदारीनं राजस्थानची टीम 5 विकेटवर 185 धावा करु शकली. अश्विननं बॉलिंग करताना 3 ओव्हर्समध्ये 30 धावा दिल्या. तर, रियान परागला त्याच्या कामगिरीबाबत प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.
Thanks for the show, Ash Anna. 🔥pic.twitter.com/oVZuJcPe6j
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 28, 2024
राजस्थानचा होम ग्रांऊडवर दुसरा विजय
राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत करत विजय मिळवला. दिल्लीला डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, दिल्लीच्या नियमित अंतरानं विकेट पडल्या आणि त्यांनी मॅच गमावली. राजस्थान रॉयल्सनं दुसऱ्या विजयासह चार गुण मिळवले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत सध्या पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सपेक्षा चेन्नई सुपर किंग्जचं नेट रनरेट चांगलं असल्यानं ते पहिल्या स्थानावर आहेत. आरसीबीची पुढील मॅच मुंबई इंडियन्स सोबत होणार आहे.
संबंधित बातम्या :
चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक