बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचे निकाल काल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाले.

अकोला : राज्यातील 120 हून अधिक नगरपालिकेत भाजपने वर्चस्व मिळवत आपला नगराध्यक्ष विजयी केला आहे. तर, काँग्रेसलाही (Congress) विदर्भात चांगलं यश मिळालं असून 40 नगरपालिकांवर आपली सत्ता आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यातच, अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून येथील 30 वर्षीय डॉक्टर युवतीने 65 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावल्याने जिल्ह्यात येथील विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. विजयानंतर डॉ.आफरीन यांनी एबीपी माझाशी संवाद साधला असता, बाळापुरातील (Nagarpalika) जनतेसाठी सर्वात पहिलं काम आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात करायचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचे निकाल काल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाले. या सर्व निकालांमध्ये लक्षवेधी निकाल लागला तो बाळापूर नगरपालिकेचा. बाळापूर नगरपालिकेतील खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलटवत डॉ.आफरीन परवीन मोहम्मद जमीर या तिशीतील तरुणीने इतिहास घडवलाय. डॉ. आफरीन परवीन यांनी बाळापूरच्या नगराध्यक्ष पदावर 1927 मतांनी विजय मिळवत काँग्रेसचा झेंडा फडकवला. आफरीन यांनी वंचित समर्थित नगर विकास पक्षाच्या रजिया बेगम खतीब यांचा पराभव केला.त्यासोबतच 25 सदस्यांच्या नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसने 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
सन 1934 मध्ये बाळापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून खतीब घराण्यातून प्रत्येक नगरपालिकेत सदस्य राहिला. तर गेल्या 65 वर्षांपासून माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्या चार पिढ्यातील सदस्य बाळापूरचे नगराध्यक्ष राहिले आहेत. नातिकोद्दीन खतीब यांचे आजोबा, वडील, स्वत: नातिकोद्दीन खतीब, पत्नी रजिया बेगम आणि मुलगा ऐनोद्दीन यांनी आत्तापर्यंत बाळापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले. यंदाच्याही निवडणुकीत नातिकोद्दीन खतीब यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष रजीया बेगम खतीब नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या. मात्र, खतीब घराण्याला यंदा यशाने हुलकावणी दिली, येथे डॉ. आफरीन परवीन यांचा विजय झाला.
कोण आहेत डॉ. आफरीन परवीन :
बाळापुरातील मोहम्मद जमीर या राजकीय घराण्याची लेक म्हणून डॉ. आफरीन यांची ओळख आहे. याशिवाय त्यांनी बीएचएमएस ही वैद्यकशास्त्रातील पदवी घेतल्याने डॉक्टर आफरीन म्हणूनही त्या परिचीत आहेत. सध्या त्या बाळापुरात मेडीकल प्रॅक्टिस करतात. वडील मोहम्मद जमीर उर्फ जम्मूसेठ यांनी बाळापूरचं नगराध्यक्षपद भूषवलं होत. सन 2013 ते 2016 या काळात वडील बाळापूरचे नगराध्यक्ष राहिले आहेत. वडील मोहम्मद जमीर उर्फ 'जम्मूसेठ' 1991 पासून सातत्याने बाळापूर नगरपालिकेत नगरसेवक पदावर कार्यरत आहेत. आता बाळापूरच्या नगराध्यक्षपदावर त्या स्वत: विजयी झाल्या असून बाळापूरमध्ये सर्वात पहिलं काम हे शिक्षण क्षेत्रात करायचं असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारांना मिळालेली मते :
डॉ.आफरीन परवीन : काँग्रेस : 12744
रजीय बेगम खतीब : वंचित : 10817
अकिलाबी मोहम्मद अनिस : एमआयएम : 3921
धनश्री अंबाडे : भाजप : 2130
काँग्रेसच्या डॉ. आफरीन परवीन 1927 मतांनी विजयी.
अंतिम निकाल :
एकूण जागा : 25 - घोषित : 25
वंचित 06
भाजप 01
काँग्रेस 13
उबाठा : 04
अपक्ष : 01
























