संजू सॅमसनची रॉयल खेळी, पहिल्याच सामन्यात ठोकल्या 82 धावा, राहुलच्या लखनौसमोर 194 धावांचे आव्हान
RR vs LSG, IPL 2024 : राजस्थाननं निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 193 धावांपर्यंत मजल मारली. संजू सॅमसन (Sanju Samson) यानं कर्णधाराला साजेशी खेळी केली.
RR vs LSG, IPL 2024 : जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) यांच्यामध्ये सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या (Sanju Samson) वादळी खेळीच्या बळावर राजस्थाननं निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 193 धावांपर्यंत मजल मारली. संजू सॅमसन (Sanju Samson) यानं कर्णधाराला साजेशी खेळी केली. संजू सॅमसन यानं 82 धावांची खेळी केली. लखनौसमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान आहे.
राजस्थानची खराब सुरुवात -
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय सुरुवातीला चुकलाच. कारण, राजस्थानचे दोन्ही सलामी फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. जॉस बटलर फक्त 11 धवाा काढून बाद झाला. बटलरने 9 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या. तर यशस्वी जायस्वाल यानं 12 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावा चोपल्या. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन यानं राजस्थानच्या डावाला आकार दिला.
संजू सॅमसनने डाव सावरला, रियानची शानदार खेळी -
संजू सॅमसन यानं युवा रियान पराग याला हाताशी धरत झटपट धावसंख्या वाढवली. दोघांनी चौकार षटकारांचा पाऊस पाडला. संजू सॅमसन यानं रियान परागसोबत तिसऱ्या विकेटसाठी 59 चेंडूमध्ये 93 धावांची भागिदारी केली. दोघांनी लखनौच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रियान पराग यानं 29 चेंडूमध्ये तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. रियान परागचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. रियान पराग बाद झाल्यानंतर शिमरोन हेटमायरही लगेच तंबूत परतला. हेटमायरला फक्त पाच धावाच करता आल्या, रवी बिश्नोईनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
Steadied the ship and stepped on the gas! 🔥 pic.twitter.com/6sr3sNaFYy
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 24, 2024
संजू सॅमसनचा फिनिशिंग टच -
हेटमायर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन यानं आक्रमक रुप घेतलं. संजू सॅमसन यानं ध्रुव जुरेल याच्यासोबत लखनौच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोघांनी अखेरच्या 22 चेंडूमध्ये 43 धावांचा पाऊस पाडला. संजू सॅमसन यानं नाबाद 82 धावांची खेळी केली. तर ध्रुव जुरेल नाबाद 20 धावांवर माघारी परतला. संजू सॅमसन यानं 52 चेंडूमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा जोडल्या. तर ध्रुव जुरेल यानं एक षटकार आणि एकाचा चौकाराच्या मदतीने 12 चेंडूत 20 धावा केल्या.
Mass innings 🔥 pic.twitter.com/JQCWScPN24
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 24, 2024
लखनौची गोलंदाजी कशी राहिली ?
नवीन उल हक सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नवीन यानं धावा दिल्या, पण त्याला दोन विकेटही मिळाल्या. क्रृणाल पांड्यानं चार षटकात फक्त 19 धावा कर्च केल्या, पण त्याला विकेट घेता आली नाही. मोहसीन खान आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन):
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर