राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
RR vs PBKS: कर्णधार सॅम करनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने राजस्थानचा पाच विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेले 145 धावांचे आव्हान पंजाबने पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.
RR vs PBKS: कर्णधार सॅम करनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने राजस्थानचा पाच विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेले 145 धावांचे आव्हान पंजाबने पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. पंजाबकडून कर्णधार सॅम करन यानं नाबाद 63 धावांची खेळी केली. पंजाबनं या विजयासह गुणतालिकेत नवव्या स्थान मिळवले. मुंबई इंडियन्स दहाव्या क्रमांकावर घसरला आहे.
संजू सॅमसन याचा राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान निश्चित झालेय. पण त्यांना लागोपाठ चौथ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थानच्या फलंदाजांकडून लौकिकास साजेशी कामगिरी झालेली नाही. प्लेऑफआधी राजस्थानच्या संघासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या 48 धावांच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत मजल मारली होती. पंजाबने हे माफक आव्हान पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.
राजस्थानने दिलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय खराब झाली. भेदक गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच षटकात धक्का पंजाबला धक्का दिला. त्यानं प्रभसिमरन सिंहला 6 धावांवर बाद केलं. राइले रुसो 22 धावा करून बाद झाला. जॉनी बेयरस्टो सपशेल अपयशी ठरला. तो 22 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला. शशांक सिंह आज भोपळाही फोडू शकला नाही. पंजाबने अवघ्या 48 धावांत चार फलंदाज गमावले होते. राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला होता. पण कर्णधार सॅम करन यानं एकाकी झुंज दिली.
कर्णधार सॅम करन आणि उपकर्णधार जितेश शर्मा यांनी पंजाबचा डाव सांभाळला. दोघांमध्ये 63 धावांची भागीदारी झाली. जितेश शर्मा 20 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. सॅम करननं अर्धशतकी खेळी खेळली. तो 41 चेंडूत 63 धावा करून नाबाद राहिला. आशुतोष शर्मानं नाबाद 17 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानकडून आवेश खान आणि युझवेंद्र चहलनं 2-2 बळी घेतले. सॅम करन यानं कर्णधाराला साजेशी कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत दोन विकेट घेतल्या, तर फलंदाजीमध्ये शानदार अर्धशतक ठोकले. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
राजस्थानच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये पंजाबच्या फलंदाजांना भेदक मारा केला. 4.5 षटकातच पंजाबचे चार आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. सामना राजस्थान जिंकणार, असाच अंदाज वर्तवला जात होता. पण सॅम करन यानं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. त्याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर शानदार फलंदाजी केली. सॅम करन याने 63 धावांच्या खेळीत तीन षटकार आणि पाच चौकार ठोकले. लो स्कोरिंग सामन्यात सर्वाधिक षटकार सॅम करनच्या नावावर आहेत. सॅम करन याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.