IPL 2022 : बुमराहनेच काढली मुंबईची विकेट? विश्वास बसत नाही, पाहा आकडे
IPL 2022 marathi News : मुंबईच्या गोलंदाजीचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहला यंदा लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई आणि चेन्नई संघाचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपले आहे. या दोन्ही संघाने आतापर्यंत 9 आयपीएल चषकावर नाव कोरलेय. पण यंदा दोन्ही संघाला लवकरच गाशा गुंडाळावा लागलाय. चेन्नईच्या आशा अद्याप जिवंत आहेत, पण प्लेऑफमध्ये त्यांची पोहचण्याची शक्यताही कमीच आहे. पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. मुंबईला लागोपाठ आठ पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची अनेक कारणे असतील... त्यातीलच एक कारण जसप्रीत बुमराह असल्याची चर्चा आहे.
मुंबईच्या गोलंदाजीचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहला यंदा लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जगातील सर्वात घातक आणि यॉर्कर फेकणारा गोलंदाज म्हणून बुमराहला ओळखले जातेय. मुंबईच्या विजयात बुमराहचा नेहमीच मोठा वाटा असतो. पावर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये बुमराहने अनेकदा मुंबईसाठी दर्जेदार गोलंदाजी केली. पण यंदा बुमराहाची जादू चालली नाही. बुमराहाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलेय. बुमराहाला विकेट काढता आल्या नाहीत. शिवाय धावाही रोखता आल्या नाहीत. बुमराह लयीत नसल्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघांनी घेतला. त्यामुळे मुंबई प्लेऑफमधून बाहेर जाण्यास बुमराहही कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको.
यंदाच्या हंगामात मुंबईने दहा सामन्यात फक्त दोन विजय मिळवलेत. या दहा सामन्यात बुमराहने 38.2 षटकात 304 धावांच्या मोबदल्यात फक्त पाच विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच बुमराहला प्रत्येक विकेटसाठी जवळपास 60.80 धावा खर्च कराव्या लागल्या आहेत. मागील पाच सामन्यात तर बुमराहची गोलंदाजी अतिशय कमकुवत जाणवली. 17 धावा देऊन तीन विकेट... ही यंदाची बुमराहची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. दहा सामन्यात फक्त पाच विकेट... त्यामध्ये एका सामन्यात तीन विकेट... म्हणजे, उर्वरित 9 सामन्यात बुमराहची गोलंदाजीची धार कशी असेल, याचा अंदाज लावू शकता. यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात बुमराह तब्बल 46 व्या क्रमांकावर आहे.
2016 पासून जसप्रीत बुमराहची मुंबई इंडियन्ससाठी कशी होती कामगिरी?
2021 मध्ये बुमराहने 14 सामन्यात 55 षटकामध्ये 410 धावा देत 21 विकेट घेतल्या होत्या. प्रत्येक विकेटसाठी 19.52 धावा खर्च केल्या होत्या. मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
2020 मध्ये जसप्रीत बुमराहने 15 डावात 60 षटकात 404 धावा खर्च करत 27 विकेट घेतल्या होत्या. प्रत्येक विकेटसाठी बुमराहने 14.96 धावा खर्च केल्या होत्या.
2019 मध्ये जसप्रीत बुमराहने 16 सामन्यात 61 षटकं टाकली होती. 409 धावा देत 19 विकेट घेतल्या होत्या.
2018 मध्ये बुमराहने 4 सामन्यात 17 विकेट घेतल्या होत्या.
2017 मध्ये बुमराहने 16 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या.
2016 मध्ये 14 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या.
फक्त बुमराहच जबाबदार आहे?
मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचं आव्हान संपण्यासाठी फक्त जसप्रीत बुमराहच जबाबदार नाही.. पण त्याच्या कामगिरीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जसप्रीत बुमराहला यंदा आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बुमराहशिवाय रोहित शर्मा, ईशान किशन, कायरन पोलार्ड यांनाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही.
बुमराह प्रभावहीन का दिसतोय?
जसप्रीत बुमराहला लयीत दिसत नाही, याला कारणही तसेच आहे. बुमराहच्या जोडीस असणारे इतर गोलंदाजांची कामगिरी दर्जेदार नाही. बुमराह एका बाजूने फलंदाजांना अडचणीत आणत आहे. पण दुसऱ्या बाजून गोलंदाज धावा देत आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज बुमराहला रिस्क न घेता खेळतात अन् इतर गोलंदाजांची धुलाई करतात. त्यामुळे बुमराहच्या जोडीला दुसरा दर्जेदार गोलंदाज नसणे मुंबईच्या पराभवाचे कारण आहे.. याआधीच्या हंगामात बुमराहसोबत ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा, जोफ्रा आर्चर आणि मिशेल मॅक्लेघन यासारके गोलंदाज होते. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी धारधार जाणवत होती. पण यंदा मुंबईच्या गोलंदाजीचा सर्व भार जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर पडला. त्यामुळे जसप्रीत बुमराहची गोलंदाजी प्रभावी दिसत नाही.