MS Dhoni : सगळं ठरलेलं होतं? चेन्नईचं नेतृत्त्व ऋतुराजकडे, धोनीनं फेसबुक पोस्टमधून दिलेले संकेत
MS Dhoni Ruturaj Gaikwad : 17 व्या आयपीएलपूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कॅप्टन्सीची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आली आहे.
चेन्नई : महेंद्रसिंह धोनी यानं चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे दिली आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जमध्ये 2019 पासून आहे. महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या टीमला पाचवेळा विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आता युवा खेळाडूकडे नेतृत्त्वाची धुरा दिली आहे. महेंद्रसिंह धोनीनं 2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नईला विजेतेपद मिळवून दिलं होतं.धोनी त्या हंगामात पूर्णपणे फिट नव्हता, मात्र त्यानं चेन्नईला विजेतेपद मिळवून दिलं होतं. महेंद्रसिंह धोनीनं काही दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट करुन भविष्यातील बदलांचे संकेत दिले होते.
महेंद्रसिंह धोनीकडे 2023 मध्ये पुन्हा चेन्नईच्या नेतृत्त्वाची धुरा आली होती. 2022 च्या आयपीएलमध्ये चेन्नईची धुरा रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली होती. आता 2024 च्या आयपीएलची धुरा ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आली आहे.
महेंद्रसिंह धोनीनं फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
धोनीनं 4 मार्च रोजी फेसबुक पोस्ट केली होती. नव्या हंगामाची वाट पाहू शकत नाही, त्यामध्ये नव्या भूमिकेत असेन, वाट पाहा असं धोनीनं म्हटलं होतं. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जनं 2010,2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये विजय मिळवला होता.चेन्नई सुपर किंग्जनं देखील महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे.
महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलमध्ये 250 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 5082 धावा केल्या असून 135 च्या स्ट्राइक रेटनं 38.79 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये 24 अर्धशतकांची नोंद आहे. धोनीनं आयपीएलमध्ये 239 षटकार मारले आहेत.
चेन्नईच्या नेतृत्त्वबदलावर सुनंदन लेले काय म्हणाले?
ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईची जबाबदारी देण्यात आली आहे.क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी यावर भाष्य केलं आहे. होय महेंद्रसिंह धोनीचं हे आयपीएलचं शेवटचं वर्ष आहे. हा धक्कादायक निर्णय नाही.ज्यावेळी रवींद्र जडेच्या हाती धुरा सोपवली होती त्यावेळी संघ व्यवस्थापनामध्ये चर्चा झाली होती की ऋतुराजला याच्यात घ्यायचं का? रवींद्र जडेला कप्तान करताना घेतलेला निर्णय त्याच्या ज्येष्ठतेचा विचार करुन घेतला होता. जडेजानं क्रिकेट खेळत असताना त्यानं एकाही टीमचं नेतृत्त्व केलेलं नव्हतं.
ऋतुराज गायकवाडनं महाराष्ट्राचं नेतृत्त्व सक्षमपणे केलं आहे. धोनी आणि ऋतुराजचा स्वभाव सारखाच आहे. ऋतुराज हा कष्टकरी आणि मेहनती आहे पण कुठंही चमक धमक नाही. तो ऑरेंज कॅपचा मानकरी असल्यानं त्याला संधी दिली गेली असावी, असं सुनंदन लेले म्हणाले.
दरम्यान, मुंबई इंडियन्सनं ज्याप्रमाणं रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवली त्याच प्रमाणं चेन्नईमध्ये देखील महेंद्रसिंह धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूकडे संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
CSK New Captain: मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार, एमएस धोनीचा राजीनामा