(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs RCB : विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला टाकले मागे
IPL 2022 : टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानी पोहचलाय.
Virat Kohli Record Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminator IPL 2022 : रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात कोलकाता येथे आयपीएल 2022 चा एलिमिनेटर सामना सुरु आहे. नाणेफेक गमावल्यनंतर आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलाय. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानी पोहचलाय. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंचला मागे टाकलेय.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम वेस्ट विंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. तर भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 341 सामन्यात 10590 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीने टी20 मध्ये आतापर्यंत पाच शतके आणि 78 अर्धशतके झळकावली आहेत. तर युनिवर्स बॉस ख्रिस गेलने 463 सामन्यात 14 हजार 562 धावांचा पाऊस पाडलाय. ख्रिस गेलने टी20 मध्ये 22 शतके आणि 88 अर्धशतके लगावली आहेत. या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकचा क्रमांक लागतो. मलिकने 472 सामन्यात 11698 धावा केल्या आहेत.
वेस्ट विंडजचा माजी कर्णधार आणि मुंबईचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने 592 टी 20 सामन्यात 11571 धावा केल्या आहेत. यादरम्यान पोलार्डने एक शतक आणि 56 अर्धशतके झळकावली आहेत. पोलार्डची सर्वोत्कृष्ट खेळी 104 धावांची आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरने 325 सामन्यात 10740 धावा केल्या आहेत. वॉर्नरने आठ शतके आणि 90 अर्धशतके झळकावली आहेत.
विराट इज बॅक -
आयपीएल 2022 मधील आरसीबीच्या अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहलीने 73 धावांची खेळी करत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने 14 सामन्यात 309 धावा केल्या आहेत. यादरम्यान दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.