(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs MI: सूर्याची एकाकी झुंज व्यर्थ, मुंबईचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात, कोलकात्याचा 24 धावांनी विजय
KKR vs MI : वानखेडे मैदानावर कोलकात्यानं तब्बल 12 वर्षानंतर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबई इंडियन्सवर कोलकात्यानं 24 धावांनी विजय मिळवला.
KKR vs MI : वानखेडे मैदानावर कोलकात्यानं तब्बल 12 वर्षानंतर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबई इंडियन्सवर कोलकात्यानं 24 धावांनी विजय मिळवला. कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना 169 धावांपर्यंत मजल मारली होती. पकोलकात्याकडून वेंकटेश अय्यर यानं 70 धावांची शानदार केळी केली होती. प्रत्युत्तर दाखल मुंबईचा संघ 145 धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईकडून सूर्यकुमार यादव यानं एकाकी झुंज दिली. त्यानं शानदार अर्धशतक ठोकलं, पण त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही. परिणामी मुंबईला आठव्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळं मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले आहे. कोलकात्यानं सातव्या विजयाची नोंद केली.
कोलकात्यानं दिलेल्या आव्हानाचा सामना करताना मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. मुंबईचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. रोहित शर्मा 11 धावा, ईशान किशन 13 धावा आणि नमन धीर फक्त 11 धावा काढून तंबूत परतला. एका बाजूला विकेट जात असताना दुसऱ्या बाजूला सूर्यानं शानदार फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव यानं अर्धशतक ठोकत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या. सूर्यकुमार यादव यानं 35 चेंडूमध्ये 56 धावा केल्या. यामध्ये दोन षटकार आणि सहा चौकाराचा समावेश होता. कोलकात्याकडून सुनिल नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी सुरुवातीला शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर मिचेल स्टार्क यानं मुंबईच्या तळाच्या फलंदाजांना तंबूत धाडलं.
170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 6 षटकांत 3 विकेट गमावत 46 धावा केल्या. पण त्यानंतरही पडझड थांबली नाही. पुढील 24 धावांत मुंबईने तीन विकेट गमावल्या. मुंबईची अवस्था 6 बाद 71 अशी दैयनीय झाली होती. पण दुसऱ्या बाजूला असणार्या सूर्यानं फटकेबाजी करत नामुष्की टाळली. सूर्यकुमार यादव यानं 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्या खेळत असताना मुंबईच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या, पण 16व्या षटकात 56 धावा करून सूर्यकुमार यादव बाद झाला. मुंबईला शेवटच्या 4 षटकात विजयासाठी 46 धावांची गरज होती, टीम डेविड मैदानात होता. त्यानं पुढच्या दोन षटकात फक्त 13 धावा काढल्या. त्यामुळे अखेरच्या दोन षटकात मुंबईला विजयासाठी 32 धावांची अवशकता होती. स्टार्कच्या चेंडूवर त्यानं षटकार मारुन सुरुवात केली, पण पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर चावलाही लगेच तंबूत परतला. स्टार्कने त्याच षटकात गेराल्ड कोएत्झीला क्लीन बोल्ड करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
कोलकात्याचा भेदक मारा
कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत पाठवलं. नारायण आणि चक्रवर्ती यांनी 4 षटकात प्रत्येकी 22 धावा खर्च करत दोन दोन विकेट घेतल्या. मुंबईला मधल्या षटकात धावा काढण्यात अपयश आले. डेथ ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कने अचूक टप्प्यावर मारा केला. स्टार्कने चार फलंदाजांना बाद केले.