(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022, KKR vs PBKS : रसेलच्या वादळापुढे पंजाबचा धुव्वा, कोलकात्याचा सहा विकेटनं विजय
IPL 2022, KKR vs PBKS : उमेशचा भेदक मारा, रसेलची वादळी खेळी, कोलकात्याचा पंजाबवर सहा गडी राखून विजय
IPL 2022, KKR vs PBKS : उमेश यादवचा भेदक मारा आणि त्यानंतर अंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीच्या बळावर कोलकाता संघाने पंजाबचा सहज पराभव केला आहे. कोलकाताने पंजाबवर सहा गड्याने विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेले 138 धावांचे आव्हान कोलकाताने 33 चेंडू आणि सहा गडी राखून पार केले. कोलकात्याचा या हंगामातील दुसरा विजय आहे.
पंजाबने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली होती. सलामी पलंदाज अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर चांगल्या सुरुवातीनंतर लगेच माघारी गेले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितेश राणा लागोपाठ बाद झाले, त्यामुळे कोलकाताचा संघ अडचणीत सापडला होता. पण आंद्रे रसेल याने वादळी अर्धशतकी खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रसेलने 31 चेंडूत वादळी 70 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रसेलने 8 षटकारांचा पाऊस पाडला. रसेलला सॅम बिलिंग्सने चांगली साथ दिली. बिलिंग्सने नाबाद 24 धावांची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने 26 धावांची छोटेखानी खेळी केली. पंजाबकडून राहुल चाहरने भेदक मारा केला. एकीकडे पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना राहुलने कंजूष गोलंदाजी केली. राहुलने चार षटकात 13 धावा देत दोन गडी बाद केले. त्याशिवाय कगिसो रबाडा आमि ओडियन स्मिथ यांना प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
दरम्यान, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. पंजाबला 20 षटकं फलंदाजाही करता आली नाही. पंजाबने 18.2 षटकात 137 धावांपर्यत मजल मारली. पंजाबकडून एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. सुरुवातीला भानुशा राजपक्षे याने आक्रमक खेळी केली. त्यानंतर कगिसो रबाडाने अखेरच्या षटकात वादळी फलंदाजी करत संघाची धावसंख्या 130 पार नेली. राजपक्षेनं पंजाबकडून सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. त्यानंतर रबाडाने 25 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकाही फलंदाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही.
उमेशचा भेदक मारा, वरुण चक्रवर्तीची फिरकी
उमेश यादवने पावरप्लेमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना बाद केले. पहिल्याच षटकात उमेश यादवने कर्णधार मयांकला बाद करत कोलकाताला चांगली सुरुवात करुन दिली. उमेश यादवने चार षटकांत 23 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीला विकेट जरी मिळाली नसली तरी त्याने भेदक मारा केला. वरुण चक्रवर्तीने चार षटकात अवघ्या 14 धावा देत पंजाबच्या फलंदाजांना धावा काढून दिल्या नाहीत. सुनिल नारायण यानेही चार षटकात 23 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.